लिंबू फळबागेचे नियोजन असे कराल Citrus (Lime) cultivation practices
लिंबू फळबागेचे नियोजन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
♥लिंबू लागवडीसाठी रोपे रंगपूर लिंबावर डोळा भरून किंवा बियांपासून तयार करतात. बियांपासून तयार केलेली रोगमुक्त रोपे लागवडीस निवडावीत. रोपे खात्रीच्या ठिकाणाहूनच घ्यावीत. लागवडीसाठी साई सरबती, विक्रम किंवा प्रेमालिनी जातीची रोपे निवडावीत.
♥महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शोधलेली साई सरबती ही लिंबाची जात स्थानिक जातींपेक्षा जास्त उत्पादन देते.
♥सर्वसाधारणपणे मध्यम काळी, उत्तम निचऱ्याची, जास्त चुनखडी किंवा क्षार नसलेली जमीन कागदी लिंबू लागवडीस निवडावी.
♥उन्हाळ्यात लागवडीपूर्वी एक महिना अगोदर 6 X 6 मी. अंतरावर 1 X 1 X 1 मी. आकाराचे खड्डे घेऊन ते उन्हात तापू देणे गरजेचे असते.
लागवडीपूर्वी पोयटा माती, चार ते पाच घमेली शेणखत, एक ते दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50-70 ग्रॅम फॉलिडॉल यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत.
♥पावसाळा सुरू झाल्यानंतर मुळांना इजा न होऊ देता खड्ड्यात रोपांची लागवड करावी. माती घट्ट दाबावी आणि लगेच पाणी द्यावे.
♥लिंबू हे तिन्ही बहरांत घेतले जाणारे फळपीक आहे, पण आंबे बहर महत्त्वाचा आहे. या बहराचे दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी हंगामानुसार किडींच्या प्रार्दुभावाची लक्षणे वेळीच ओळखून नियंत्रण करणे आवश्यक असते.
♥लिंबावर वेगवेगळ्या किडींचा उपद्रव होत असतो, यामुळे फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होतोच, त्याचबरोबरीने उत्पादनातदेखील घट येते. यासाठी किडींच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून योग्य वेळी नियंत्रणाचे उपाय केले, तर निश्चिपतच चांगले उत्पादन मिळू शकते.
♥लिंबावरील फुलपाखरू
अळी हिरव्या रंगाची असते व तिच्या डोक्यावर दोन शिंगे असतात. फुलपाखरू पिवळ्या रंगाचे असते व पंखावर काळ्या खुणा असतात.
अळी कोवळी पाने कुरतडून खाते व फक्त पानांच्या शिरा शिल्लक राहतात. अळीचा उपद्रव नर्सरीमध्येही जास्त आढळतो.
♥नाग अळी
अळी पिवळसर रंगाची असते व पतंग सोनेरी रंगाचा असतो.
लहान अळी पाने पोखरून आतील पर्णपेशी खाते, त्यामुळे आतील बाजूस वेडीवाकडी पोकळी किंवा खाण तयार होते. अशी पाने पिवळी होऊन गळून पडतात. ही अळी कॅंकर रोग पसरवण्यासही मदत करते.
♥काळी माशी व पांढरी माशी
नावाप्रमाणेच पांढरी माशी पांढरट, पिवळसर रंगाची असते व काळी माशी काळ्या रंगाची व लहान आकाराची असते.
पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषण करतात, त्यामुळे पाने सुकतात व तपकिरी रंगाची होतात. रस शोषण केल्यामुळे पानांवर मधासारखा चिकट द्रव स्रवतो व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यास "कोळशी' रोग असेही म्हणतात.
♥रस शोषण करणारा पतंग
पतंग मोठ्या आकाराचा असतो. पुढचे पंख राखाडी किंवा तपकिरी रंगाचे असतात. पाठीमागचे पंख पिवळ्या रंगाचे असतात व त्यावर गोलाकार किंवा किडनीच्या आकाराचा काळा ठिपका असतो.
अळी पिकास हानिकारक नसते. ती बांधावरील गवत खाते. पतंग मात्र फळामध्ये तोंड घुसवून फळातील रस शोषण करतो व नंतर झालेल्या छिद्रांतून बुरशी, जिवाणू यांचा फळामध्ये प्रवेश होतो व त्यामुळे ते फळ पूर्णपणे नासून जाते.
♥सायला
लहान आकार, तपकिरी रंग, टोकदार डोके व यांच्या शरीराची मागची बाजू वर उचललेली असते.
पिल्ले व प्रौढ पाने, फुले व कोवळ्या फांद्यांमधून रस शोषण करतात, त्यामुळे पाने गळून पडतात व कोवळ्या फांद्या वाळून जातात. जी लहान फळे आलेली असतील, तीसुद्धा गळून पडतात.
♥कीड व्यवस्थापन
बागेत स्वच्छता राखावी, पडलेली पाने, फळे गोळा करून नष्ट करावीत.
नाग अळीस कमी बळी पडणाऱ्या अदिनिमा, झुमकिया यांसारख्या जातींची लागवड करावी.
♥फेब्रुवारी महिन्यात खोडाला बोर्डो पेस्ट लावावी.
♥रोप लागवडीपासून सुमारे 3 ते 4 वर्षे दर वर्षी फेब्रुवारी, जून, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात 5 टक्के निंबोळी अर्क किंवा 10 टक्के लिंबाच्या पानाचा अर्क किंवा 15 मि. लि. क्लो-रपायरीफॉस प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात.
♥मार्च महिन्यात नाग अळी किंवा पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा 20 मि.लि. ट्रायझोफॉस प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रति हेक्ट री 20 पिवळे चिकटपट्टी सापळे लावावेत.
♥काळ्या माशीच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्क, एक टक्का धुण्याची पावडर, दोन ते चार ग्रॅम व्हर्टिसिलिअम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे, तसेच मॅलाडा बोनॅनसिस या परभक्षी कीटकाच्या 25 अळ्या प्रत्येक झाडावर सोडाव्यात.
13 ग्रॅम ऍसिफेट प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात आंबे बहरासाठी एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात किंवा मृग बहरात जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात फवारणी करावी.
♥पिठया ढेकूण नियंत्रणासाठी कीड दिसून आल्यावर क्रिप्टोलिमस मॉन्ट्रोझिअरीचे चार ते पाच भुंगेरे किंवा अळ्या प्रत्येक झाडावर सोडाव्यात, तसेच व्हर्टिसिलिअम लेकॅनी 20-40 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रस शोषण करणाऱ्या पतंगांच्या नियंत्रणासाठी सूर्य मावळल्यानंतर बागेत धूर करावा.
♥बागेत प्रकाश सापळे लावावेत.
पतंगाच्या नियंत्रणासाठी 100 ग्रॅम गूळ अधिक सहा ग्रॅम व्हिनेगार अधिक दहा मि.लि. मेलॅथिऑन अधिक एक लिटर पाणी यांचे द्रावण तयार करावे, त्यानंतर मोठ्या तोंडाच्या बाटलीत हे द्रावण घेऊन एक बाटली प्रति दहा झाडे या प्रमाणात फळे कच्ची असताना झाडांवर बांधावी.
♥लिंबू लागवडीविषयी अधिक माहितीसाठी संपर्क -
अखिल भारतीय समन्वयित लिंबूवर्गीय फळे सुधार योजना,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,
राहुरी,
जि. अहमदनगर
फोन - 02426 - 243247.
संकलीत!
Comments
Post a Comment