कारले नियोजन असे कराल Bitter gourd cultivation practices
कारले नियोजन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
♥कारली हे वेलवर्गीय पीक असल्याने वेलींना आधार दिला असता त्यांची वाढ चांगली होते. नवीन फुटीला सतत चांगला वाव राहतो आणि त्यामुळे फळधारणा चांगली होते. दर्जेदार आणि प्रमाणात उत्पादन मिळण्याकरिता वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीच्या आधाराने वाढवणे फायदेशीर दिसून आले आहे. वेलवर्गीय भाज्या मंडप, ताटी आधाराशिवाय चांगल्या येत नाहीत.
जमिनीवर लागवड केली असता काही मर्यादित फुटवे आल्यानंतर नवीन फुटवे येत नाहीत आणि वेली केवळ एकदाच फळे देतात. मंडपावर वेली सहा ते सात महिने चांगल्या राहतात, तर जमिनीवर केवळ तीन ते चार महिनेच चांगल्या राहतात, त्यामुळे लागवडीसाठी मंडप किंवा ताटी पद्धतीचा वापर करावा. मंडप केल्याने फळे जमिनीपासून पाच ते सहा फूट उंचीवर वाढतात, त्यामुळे पाने आणि फळे यांचा जमिनीशी संपर्क न आल्यामुळे ओलावा लागून ती सडत नाहीत, कीड व रोगांचे प्रमाण कमी राहते. फळे लोंबकळती राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि चांगला राहतो. वेल मंडपावर पोचेपर्यंत दीड ते दोन महिने कालावधी जातो, यामुळे पिकामध्ये पालेभाज्यांसारखी मिश्रपिके घेता येतात.
♥कारले लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून पुरेसे शेणखत मिसळावे.
लागवड जून-जुलै आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत करावी. ताटी पद्धतीने लागवड करण्यासाठी 1.5 x 1 मीटर अंतराने लागवड करावी. लागवडीसाठी फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी या जातींची निवड करावी.
लागवडीसाठी प्रतिहेक्टरी दोन किलो बियाणे लागते.
लागवडीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास 2.5 ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. लागवडीपूर्वी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावे. पिकावर केवडा, भुरी हे रोग येतात. तसेच फळमाशी, सूत्रकृमीचा प्रादुर्भाव दिसतो.
♥महत्त्व : कारली या वेलवर्गीय फळभाजीस आहारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून यामध्ये शरीराच्या वाढीस, पोषण व आरोग्य रक्षणासाठी असलेली खनिजद्रव्ये, जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहेत. कारली या फळभाजीचा उपयोग मधुमेहाचा विकार असणाऱ्या व्यक्तींनी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केल्यास साखरेचे प्रमाण कमी होऊन मधुमेह आटोक्यात येतो. कारल्यातील असणाऱ्या कडू तत्त्वांमुळे, 'कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी ते कडूच' ही जुनी म्हण संयुक्तीक वाटते व ह्याच कडू तत्त्वामुळे शरीरातील कृमी कमी करता येतात.
♥अशा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण असणाऱ्या, सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या व मागणी बऱ्यापैकी (शहर, स्थानिक, परदेश निर्यातीस वाव असणारी) तसेच उत्पादन मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कारली या वेलवर्गीय फळभाजीची व्यापारी तत्त्वावर लागवड केल्यास फायदेशीर ठरते.
♥जमीन : कारली हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येऊ शकते. हलकी ते मध्यम प्रकारची, उत्तम निचरा असलेली जमीन कारल्यासाठी योग्य आहे. खारट, चोपण तसेच चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीत कारल्याची लागवड करू नये.
♥हवामान : कारली हे पिक उष्ण हवामानात चांगले येते. जास्त पाऊस असल्यास लागवड करू नये. कारण मुळांशी पाणी साचल्यास वेली पिवळ्या पडण्याची शक्यता असते.
♥जाती :
(१) जौनपुरी : हिरवी फळे एक फूट लांब असलेली जात असून मुंबई मार्केटमध्ये बऱ्या पैकी मागणी असते. तर इतर राज्यांमध्ये कमी मार्केट असते. ह्या जातीस शिरा व टणकपणा कमी असतो.
२) पांढरी कारली : मागणी चांगली असते, परंतु हिरव्या कार्ल्यापेक्षा कमी भाव मिळतो. दुबईसारख्या देशात एक्सपोर्ट होतात.
३) अरका हरीत : भारतीय बागवानी अनुसंधान संस्था, बैंगलोरची जात असून फळे हिरवी, जाड व भरपूर गर असलेली असतात.
४) कोइमतूर लाँग : तामिळनाडू कृषी विद्यापीठाची जात असून फळे लांब व फिकट हिरवी असतात.
५) महिको व्हाईट लाँग : लागवडीपासून ७५ ते ७८ दिवसात पीक काढणीस तयार होते. फळाचा रंग पांढरा, साल मध्यम जाड व भरपूर शिरा असून फळांची लांबी ९ ते १२ इंच असते.
६) महिको ग्रीन लाँग : फळांचा रंग गडद हिरवा व टोकाकडे फिकट असून इतर वैशिष्ट्ये महिको व्हाईट लाँग प्रमाणेच आहेत.
७) पुसा विशेष : बुटकी जात असल्याने एकरी झाडांची संख्या जास्त ठेवता येते. या जातीची फळे हिरवी, मध्यम लांबीची, जाड साल असलेली असून भाजीसाठी लोणच्यासाठी योग्य आहेत.
८) महिको कंपनीच्या संकरीत जाती -
अ ) एम. बी. टी. एच. १०१ : ५० ते ५५ दिवसात पीक तयार होते. फळाचे सरासरी वजन ६५ ते ७० ग्रॅम असून फळांची लांबी १८ ते २० सें.मी. असते. फळे गडद हिरव्या रंगाची, चांगल्या शिरा असलेली जात आहे. एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळते.
ब) एम. बी. टी. एच १०२ : ५५ ते ६० दिवसात पीक तयार होते. फळाचे सरासरी वजन १०० ते १२० ग्रॅम भरते. फळांचा रंग पांढरा असून फळे ३० ते ३५ सें.मी. लांब व बारीक असतात. एकरी १२ ते १४ टन उत्पादन मिळते.
९) हिरकणी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली जात असून या जातीची फळे आकर्षक, गर्द हिरव्या रंगाची, भरपूर काटे असून फळाची लांबी १५ ते २० सेंमी, मध्यभागी गोलाकार व दोन्ही बाजूस निमुळती असतात. वजन साधारण ५० ग्रॅम असते. लागवडीनंतर ६० दिवसांनी फळे काढणीस येतात. उत्पादन एकरी १० ते १२ टन असून काळ्या जमिनीतदेखील चांगले येते.
♥बियाणे : एकरी ३०० ते ३५० ग्रॅम बी लागते.
♥लागवडीचे हंगाम : कोणत्याही हंगामात कारल्याची लागवड करतात. कारल्याची लागवड सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात केल्यास जानेवारी - मार्च ते मे च्या दरम्यान कारली मार्केटला येतात व ह्या वेळेस भावही चांगला मिळतो, तसेच पुढे याचा खोडवाही घेता येतो.
♥लागवड : हिवाळ्यामध्ये उगवण लवकर व सशक्त होण्यासाठी बीज प्रक्रिया करुन लावल्यास उगवण तीन ते चार दिवस लवकर व सशक्त होते.
लागवडीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास 2.5 ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी.
मर होत नाही.
♥बियाणे उपचार
बियाणांची चांगली उगवण होण्यासाठी व बियाणे नरम होण्यासाठी बियाणे 30 मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा. ज्यामुळे बियाणातील सुप्तावस्था दूर होईल.
♥लागवड मांडवावर नसेल तर ३' x २' वर केलेली लागवड चांगली असून पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास हेच अंतर थोडेसे कमी ठेवावे. कारल्याची लागवड आळी पद्धतीने चार फुटावर आळी तयार करून देखील करतात. परंतु आळी तयार करण्यासाठी मजुरांचा खर्च वाढतो. म्हणून शक्यतो सरी - वरंबा पद्धतीने लागवड करावी. दक्षिणोत्तर सरी काढून पूर्व - पश्चिम लागवड वरंब्या च्या मध्यावर करावी. दोन सऱ्यामधील अंतर १ मीटर असावे.
♥मांडव पद्धतीने लागवडीसाठी ६' x ६' अंतर ठेवावे. ५ ते ६ पाने आल्यानंतर मांडव करावा. या पद्धतीने लागवड केल्यास वेलींना सुर्यप्रकाश भरपूर मिळतो. हवा खेळती राहते, कारले (फळ) मांडवावर लोंबकळते राहत असल्याने सरळ राहते. त्याचा मातीशी तसेच पाण्याशी संपर्क येत नसल्याने बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. फळांचा दर्जा उत्तम राहतो. तसेच मालाची तोडणी चांगल्या प्रकारे मिळते.
♥पाणी : पाणी नियमित देणे गरजेचे आहे. फळे लागणीच्या काळामध्ये पाणी अनियमित दिल्यास फळे वेडीवाकडी होऊन फळाची प्रत कमी होते. अधिक पाणी दिल्यास वेल बसण्याची शक्यता असते. वेली पिवळ्या पडतात. मध्यम खोलीच्या जमिनीस आठवड्यातून एकदा तर उन्हाळ्यात आठवड्यातून २ वेळा पाणी द्यावे. हलक्या जमिनीस गरजेनुसार पाणी द्यावे.
♥कीड : कारली पिकास फळ किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणवर होतो. यामुळे फळांचा दर्जा कमी होऊन बाजारभाव कमी मिळतो. मावा, तुडतुडे, देठ कुरतडणारी अळी, पाने खाणारे लाल किडे, मुळावरील कृमी व किडींचा प्रादुर्भाव देखील कारली पिकावर आढळतो.
♥रोग : भुरी, केवडा व मर या रोगांचे प्रमाण जास्त असते.
♥विशेष नोंद घेण्याजोगी विकृती व उपाय : थंडी व उन्हाळ्यातील कारल्यामध्ये विशिष्ट विकृती ही फार किचकट समस्या असून त्याची लक्षणे म्हणजे जुनी पाने पिवळी पडणे, जुन्या खोडावरील भागावर फोड, चट्टे, शेंड्याकडील पाने चेकच्या आकाराची पिवळसर दिसणे, करपून जाणे, फुले कमी लागणे, वेल नुसतेच वाढणे, फळे लागल्यास जागीच वाकणे, शेंड्याजवळ व देठाजवळ सुकणे, अकाली पिवळी पडणे, वजनास हलकी त्यापेक्षा निकृष्ट दर्जाची होणे, या सर्व विकृतींवर अनेक शेतकऱ्यांनी नियोजन करून एकरी १ ते १।। लाख रुपये उत्पन्न मिळवून त्याचा खोडवा देखील घेतला आहे. अशा प्रकारचा तयार झालेला माल आखाती राष्ट्रात निर्यात होणाऱ्या मालाहून श्रेष्ठ निघतो, असा अनुभव आहे. वरील किडी/रोग विकृती टाळण्यासाठी सुरूवातीपासून खालील औषधांचे कोष्टक सांभाळल्यास कराली पीक रोगमुक्त राहून कारल्याचे उत्पादन व दर्जा यामध्ये हमखास वाढ होते.
♥फवारणी :
१) पहिली फवारणी : कारल्याची मर न होता वाढ होण्यासाठी (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी)
२) दुसरी फवारणी : वेलींची वाढ, फुटवा होऊन रोग प्रतिकार शक्ती वाढीसाठी (उगवणीनंतर ३० दिवसांनी)
३) तिसरी फवारणी : फुलकळी लागून गळ न होता फळधारणा होण्यासाठी (उगवणीनंतर ४५ दिवसांनी)
४) चौथी फवारणी : नवीन फुट, फुलकळी चालू राहून सतत फळधारणा होण्यासाठी तसेच मालाचे पोषण होऊन मालास चमक येण्यासाठी (उगवणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी)
♥मालाचे तोडे चालू झाल्यानंतर नवीन फुट, फुलकळी सतत चालू ठेवून तोडे वाढीसाठी, वेली रोगमुक्त राहून फळांस कीड लागू नये म्हणून आणि मालाचा दर्जा उत्तम प्रतिचा मिळण्यासाठी वरील फवारणी क्र. ४ प्रमाणे दर १५ दिवसांनी फवारणी घ्यावी.
♥तोडणी : लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी तोडणी सुरू होते. १०० ते १५० दिवसांपर्यंत वेलीला कारली येत राहतात. वरीलप्रमाणे फवारण्या केल्याने कारली वर्षभरदेखील चालवता येतात.
♥उत्पादन : संकरीत जातीपासून एकरी १० ते १५ टन आणि साधारण जातीपासून ४ ते ६ टन उत्पादन मिळते.
♥लागवडीबाबत अधिक माहितीसाठी अखिल भारतीय भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (02426- 243342) किंवा कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (टोल फ्री क्रमांक - 18002330724) येथे संपर्क साधावा.
संकलित!
रोगावर उपचार कुठे सागीतले
ReplyDelete