झेंडु शेतीतील यशोगाथा
झेंडु शेतीतील यशोगाथा ♥प्रगतशील शेतकरी♥
शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणारे अनेक तरूण शेतकरी आजूबाजूला आहेत. फाळकेवाडीचा संभाजी चंद हा त्यापैकीच एक. त्याने फक्त पाच महिन्यात दोन एकरातल्या झेंडूपासून दीड लाखांचं उत्पन्न घेतलंय. त्याची ही यशोगाथा
कृषी शिक्षणात मिळणारं ज्ञान, सत्यात उतरायचं असेल तर शेती कसायला पाहिजे. म्हणजे या शिक्षणाचा खऱ्या अर्थाने उपयोग झाला असं म्हणता येईल. असाच आपल्याला मिळालेल्या कृषी ज्ञानाचा उपयोग करतोय सांगली जिल्ह्याच्या फाळकेवाडीतील तरूण शेतकरी. दोन एकरातल्या झेंडू पिकातून फक्त पाच महिन्यात दिड लाखाचं निव्वळ उत्पन्न त्याने मिळवलंय.
फाळकेवाडीच्या संभाजीने दहावीनंतर डिग्रजला दोन वर्षाचा अॅग्रीकल्चर डिप्लोमा पूर्ण केला. त्याला आता पंधरा वर्षे उलटून गेली. शेतीची आवड असल्याने त्याने शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोगही केले. त्याचे प्रयोग बहुतांशी शेतीशी संबंधीत आहेत. त्याने गुलाब, निशीगंध, झेंडू अशी फूलवर्गीय पिके घेण्यास सूरवात केली. गेल्या चार वर्षापासून तो सातत्याने झेंडूचं पिक घेतोय. यावेळी ठिंबक सिंचनवर दोन एकरावर त्याने झेंडूची लागवड केली. कलकत्ता केसरी व्हरायटीचे दोन एकरासाठी 20 हजार तरू विकत आणले. 6 फुटाची सरी सोडून सरीच्या दोन्ही बगलेत सव्वा फुटाला एक रोप या पध्दतीनं लागवड केली.
नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाला. यावेळी वातावरणात प्रचंड बदल होता. कीड आणि रोगाला पोषक वातावरण असल्याने दररोज कीटनाशक, रोगनाशकांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागल्या. या अवेळी पावसांचा फटका पिकांना बसलाच आणि फवारण्या वाढल्यानं उत्पादन खर्चात वाढ झाली. जानेवारीच्या पहिल्या आठड्यापासून फुलांची काढणी सुरू झाली. या दोन एकरचे चार भाग करून दर दिवशी एका फ्लॉट मधील झेंडूची काढणी केली जाते.
दररोज सकाळी 7 ते 11 वाजेपर्यत काढणी करून शेड मध्ये फुले ठेवली जातात. यानंतर 12 किलोचे वजन करून क्रेटमध्ये भरली जातात. जानेवारी पासून आतापर्यंत 30 टन झेंडूचे उत्पादन मिळालंय. प्रजासत्ताकदिन, महाशिवरात्र, गुडीपाडवा यावेळी झेंडूला किलोला 40 रूपये दर मिळाला. इतर वेळी मात्र क्रेट भाडे, कमिशन वजा जाता सरासरी किलोला 20 रूपये दर मिळाला. रोपांचा खर्च, मशागत, शेणखत, रासायनिक खते मजूरी, ठिबक असा सर्व खर्च साडेतीन लाख रूपयांपर्यंत आला. ठिबकचा खर्च 2 एकराचा 80 हजार रूपये आला असला तरी इथून पुढे 8 ते 10 वर्ष हा ख्रर्च विभागला जाणार आहे.
गेल्या वर्षी सरासरी 15 रूपये किलो झेंडूचा दर होता. यावर्षी दरात जरी वाढ झाली असली तरी बदलत्या वातावरणामुळे एकरी दोन ते तीन टन उत्पादनात घट आली आहे. या पाच महिन्यात सर्व खर्च वजा जाता, एकरी दिड ते दोन लाखाचं निव्वळ उत्पन्न संभाजीनं मिळवलंय. बदलत्या वातावरणात उत्पादन घेणं जिकीरीचं झालं असलं तरी यातून मार्ग काढणं क्रमप्राप्त आहे. तरच शेती फायद्याची ठरणार आहे.
संकलन ABP माझा#
Comments
Post a Comment