भोपळा (गंगाफळ किंवा काशीफळ)पिकाचा अनुभव

भोपळा (गंगाफळ किंवा काशीफळ)पिकाचा अनुभव♥प्रगतशील शेतकरी♥

♥सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कातळी जमीन अशीच पडून आहे. ही जमीन प्रयोगशीलतेने वापरल्यास तीही उपजाऊ होऊ शकते आणि आर्थिकदृष्टय़ा लाभाचीही. बाजारपेठेचा अभ्यास, नवीन शेतीचा अवलंब आणि पीक हंगामातील व्यवस्थापन केल्यास यामागील आर्थिक गणित अधिक सोपे होते, याचा आदर्शच मालवण तालुक्यातील मसुरे चांदेरवाडी येथील तरुण शेतकरी प्रकाश गोपाळ भोगले यांनी इतर शेतक-यांसमोर ठेवला आहे. सडय़ावरच्या जमिनीवर (कातळ) अवघ्या १५ गुंठे जमिनीत त्यांनी दीड टन भोपळय़ांचे विक्रमी उत्पादन साधले आहे. साधारण १५ हजार रुपयांचा यातून नफा होण्याचा अंदाज भोगले यांनी वर्तवताना या ‘प्रकाश’वाटेने इतरांनी चालण्याचा सल्लाही दिला आणि मार्गदर्शनाची तयारीही दर्शवली आहे.

♥भातशेती हा तर कोकणातील पारंपरिक व्यवसाय. मात्र संपूर्णपणे पाण्यावर विसंबून असलेली ही शेती शेतकऱ्यांसाठी वर्षागणिक तोट्याची ठरू लागली आहे. या पिकातील अनिश्चितता आणि इतरांपेक्षा काही तरी वेगळे करण्याच्या ईर्षेने प्रकाश भोगले यांनी आपल्या चांदेर सडा या कातळी जमिनीवर पावसाळय़ात भोपळय़ाचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. मागील दोन वर्षापासून ते भोपळय़ाची लागवड करत आहेत. मात्र त्यात ते फारसे यशस्वी झाले नाहीत. मागच्या वेळच्या अनुभवातून त्यांनी या वेळी हायब्रिड बियाणांची निवड केली. पाऊस सुरू होण्यापूर्वी २० दिवसआधी या बिया पिशव्यांमध्ये रुजत घातल्या, जेणेकरून पिकास ऑक्टोबपर्यंत परिपक्वता येईल, या अंदाजाने या पिकाचे नियोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, लागवड केलेल्या जमिनीजवळ पाण्याचा स्रेतच उपलब्ध नव्हता. पाणी कमी मिळाल्यास त्याचा भोपळा पिकावर विपरीत परिणाम होतो, असा अनुभव भोगले यांनी याआधीच घेतला होता.

♥डोंगरावरील जमीन खडकाळ असल्याने सभोवतालची माती एकत्र करून साधारण आठ फूट गोलाकार व दीड फूट उंचीचा मातीचा थर या जमिनीवर देण्यात आला. यामध्ये दहा रोपे लावली. अशा प्रकारे संपूर्ण १५ गुंठय़ांत माती पसरवली. त्यामध्ये शेणखत व मिश्रखत वापरले. पाऊस पडण्यास प्रारंभ झाल्यानंतर भोपळ्याच्या रोपांची वेल तयार केलेल्या जमिनीत लावल्या व महिनाभरानंतर मिश्रखत वापरले. दीड महिन्यानंतर फळधारणा होण्यास प्रारंभ झाला. वेलीला सुरुवातीची फळे मोठी येतात. जसजशी वेल पसरते तशी ती लहान लहान होत जातात.

♥वेल पसरण्यास प्रारंभ झाल्यानंतर वेलांच्या खाली त्याने छोटय़ा झाडांच्या फांद्या टाकल्या. ज्यामुळे येणाऱ्या फळांचा संपर्क जमिनीशी आला नाही. फुलाचा अथवा फळाचा जमिनीला स्पर्श झाल्यास त्यास रोगाची लागण होण्याची भीती असते. साधारणत: चार महिन्यांनंतर फळांच्या तोडणीला सुरुवात झाली.

♥सडय़ावर असल्याने आठवडाभर जरी पाऊस गायब झाला तरी त्याचा पिकावर परिणाम होऊ शकतो असे त्याचे म्हणणे आहे. या पिकास जास्त पाऊससुद्धा उपयोगाचा नाही. त्यामुळे फु ले कुस्करण्याचा धोका असतो. प्रकाश भोगले यांनी लागवड केलेल्या पिकाच्या एका बीपासून जवळपास १५ भोपळे त्याला मिळाले आहेत. पितृपक्षामध्ये भोपळय़ाच्या भाजीला जास्त मागणी असल्याने अनेक जण घरी येऊन भोपळा खरेदी करायचे. तर मालवण येथील भाजी व्यापा-यांना त्यांनी घाऊक दराने विक्री केली आहे. मोठय़ा भोपळय़ांना चांगला दर मिळतो, असे त्यांनी सांगितले.

♥गंगाफळ किंवा काशीफळ या नावानेसुद्धा ओळखल्या जाणा-या भोपळय़ाची शास्त्रीयदृष्टय़ा लागवड केल्यास एकरी १० टन पीक घेता येणे शक्य असल्याची मालवण तालुका कृषी विस्तार अधिकारी अभिजित मदने यांनी माहिती दिली.

♥आकी सूर्यमुखी, आकी चंदन, कोईमतूर एक, सीएएम १४, पुसाविश्वास, काशीफळ (संकरित एक ते दीड किलो), विशाल (रंग हिरवा), एनपीएच (तांबडा रंग) या सुधारित तसेच विद्यापीठाने सुचवलेल्या भोपळय़ाच्या जाती आहेत.

♥कृषी विभागाच्या मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पीक घेणा-या शेतक-यांनी लागवडीअगोदर एक गुंठय़ाला १०० किलो शेणखत, निमपावडर पाच किलो, ट्रायकोडमी ५० ग्रॅम मातीत मिसळणे आवश्यक आहे. प्रतिहेक्टरी दोन ते तीन किलो बियाणे वापरून रोपामध्ये चार फुटांचे अंतर ठेवावे. तसेच लागवडीनंतर १० दिवसांनी सुफला प्रतिगुंठय़ास एक किलो, ३० दिवसांनी दीड किलो द्यावे. ७५ दिवसांनी युरिया ६०० ग्रॅम ९० दिवसांनी युरिया ६०० ग्रॅम द्यावे. तसेच कृषीतज्ज्ञांच्या सल्ल्याने संजीवक वापरणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एका वेलीस दोन ते तीन फळे ठेवावीत व पिवळसर रंग फळास आल्यास त्यांची तोडणी करावी. या पिकास लाल मुंगी, पाण्याचा संपर्क आल्यास फळ फुटणे, भुरी रोग (डिनोकॅप वापरावे), फळमाशी (रक्षक सापळा वापरणे) यापासून धोका असतो. कमी मेहनत व कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारे हे पीक असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
भरडी जमीन असल्यास नफ्यात वाढ होते तसेच जिल्हय़ात तांबडय़ा भोपळय़ाचे पीक चांगल्याप्रकारे येते, अशी माहिती कृषितज्ज्ञ व्ही. सी. चौधरी यांनी दिली. बहुतांश पिकाचे मिळणारे कमी उत्पादन, भरमसाट उत्पादनखर्च आणि न परवडणारी शेती असेच सर्वत्र
चित्र दिसते.

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!