मोगरा नियोजन असे कराल ..
मोगरा नियोजन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
मोगरा फुलपिकाची लागवड प्रामुख्याने कर्नाटक, तमिळनाडू राज्यात केली जाते. आपल्याकडेही आता या फुलपिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.
या फुलपिकाला उष्ण व समशीतोष्ण, कोरडे हवामान, स्वच्छ व भरपूर सूर्यप्रकाश, मध्यम स्वरूपाचा पाऊस चांगला मानवतो. आठ तास स्वच्छ सूर्यप्रकाश मिळाल्यास या पिकाची वाढ जोमदार व फुलांचे उत्पादन चांगले मिळते. लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सामू ६.५ ते ७ असणारी जमीन निवडावी. हलक्या ते मध्यम प्रकाराच्या जमिनीत लागवड करताना १.२० १.२० मीटर (हेक्टरी ६९०० रोपे) अंतरावर ६० ६० ६० सें.मी. आकाराचे खड्डे घ्यावेत.
माती परीक्षणानुसार पोयटा माती, शेणखत किंवा गांडूळ खताच्या मिश्रणात अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट, तसेच दोन टक्के लिंडेन पावडर मिसळावी. त्यानंतर या मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत. त्यानंतर रोपांची लागवड करावी. कमी अंतरावर लागवड केल्यास रोग-किडीचा प्रादुर्भाव वाढतो. गुंडूमलई जातीसाठी लागवडीचे अंतर जास्त ठेवावे लागते. या पिकाची लागवड जूनमध्ये करावी. जमिनीचा मगदूर व रोपांचे प्रकार, फुले येण्याचा कालावधी ठरवून खतांचे प्रमाण ठरवावे. पूर्ण वाढ झालेल्या प्रत्येक रोपास दर वर्षी दहा किलो शेणखत, २५ ग्रॅम फेरस सल्फेट व चार ग्रॅम झिंक सल्फेट आणि ६० ग्रॅम नत्र, १२० ग्रॅम स्फुरद १२० ग्रॅम पालाश दोन हप्त्यांत विभागून डिसेंबर व जून महिन्यात दिल्यास अधिक उत्पादन मिळते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. हिवाळ्यात १० ते १२ दिवसांनी. उन्हाळ्यात पाच ते सात दिवसांनी. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास फुलांचे उत्पादन तर भरपूर येतेच व फुलाची उत्तम प्रत, कळीचा आकार मोठा मिळतो. मार्च ते ऑगस्ट या दरम्यान फुले येऊ लागतात. वेणी-गजरा यासाठी पूर्ण वाढलेली कळी काढावी लागते. लागवडीनंतर तिसऱ्या ते चौथ्या वर्षापासून आर्थिकदृष्ट्या उत्पादन मिळण्यास सुरवात होते व पुढे सात ते आठ वर्षे सलग उत्पादन मिळते.
मोगऱ्याविषयी थोडक्यात...
जागतिक स्तरावर मोगऱ्याची व्यापारी लागवड आशियायी देशांत होते. भारत हा एक प्रमुख मोगरा उत्पादक देश आहे. आपल्याकडे मोगऱ्याच्या अनेक जातींची लागवड करण्यात येते. सिंगल किंवा एकेरी मोगरा, डबल/दुहेरी मोगरा, मोतीया, मदनबाण, उसीमल्ली, गुंडुमल्ली, इरूवच्ची, सुजीमल्ली, रामबाणम्, माथुरिया, खोया इ. जातींची व्यापारी लागवड तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रात करण्यात येते. जस्मिन या प्रकारात मोगरा, जाई, जुई, चमेली, चंपा, नेवाळी, कुंदा, बेला, मोतीया, मदनबाण, कागडा इत्यादी विविध सुवासिक फुलांचा समावेश होतो.
- ०२४२६-२४३२४७
उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
Comments
Post a Comment