मराठी उदयोजक परिषद मध्ये मराठी अब्जाधीश उदयोगपती मा. डी.एस. कुलकर्णी यांच्या भाषणाचा संपादित अंश DSK speech about Marathi as entrepreneur
मुंबई येथे पार पडलेल्या तीन दिवस मराठी उदयोजक परिषद मध्ये मराठी अब्जाधीश उदयोगपती मा. डी.एस. कुलकर्णी यांच्या भाषणाचा संपादित अंश...
बिझनेस करताना पुरून पुरून वापरण्याची प्रवृत्ती सोडा. अंथरून पाहून पाय पसरा ही ज्या कोणी मराठी माणसाने म्हण तयार केली त्याला आपण माफ् करूया, कशाला त्याच्या नादी लागायचे. अरे व्हा ना मोठे, तुम्हाला कोणी सांगितले तुम्हाला अंथरून पांघरून मिळणार नाही म्हणून.
बाबारे मरताना डोक्यावर ५ रु सुद्धा कर्ज नको, ही दुसरी दळीद्री म्हण कोणी निर्माण केली माहित नाही. कर्ज नाही काढलं तर धंधा चालणार कुठनं. आज मुठभर जोंधळे पेरले तर पोतेभर धान्य येत. पोतेभर जोंधळे पेरले तर किती धान्य येईल हा साधा नियम आहे. आता मला सांगा स्वतःच्या घरातील जोंधळे आणून आणून तुम्ही किती आणणार, तो एक नियम आहे.
आज मी व्याख्यान द्यायला आलो आहे. आज मी इथे दमून आलो नाही, तर चिडून आलो आहे, मी आज खूप चिडलो आहे. मी स्वतः रोज माझ्या बायकोला सांगतो की जर माझे आडनाव कुलकर्णी नसतं आणि मी साला मराठी नसतो तर मी आज अंबानीला मागे टाकलं असतं. आपल्यातील जे मराठीपण आहे ना, मीच किती वेळा बोलतो पण मला सुद्धा अजून पूर्णपणे ओवरटेक करता येत नाही. मी पूर्णपणे मराठी नाही, अर्धा मारवाडी, अर्धा गुजराती व मग उरलासुरला मराठी ब्राम्हण आहे.
मी मारवाडी लोकांचा खूप मोठा भक्त आहे. हिशोबाला ते अगदी पक्के असतात. तोंडात नेहमी खडीसाखर असते. डोक्यावर त्यांच्या नेहमी बर्फ असतो. हे लोक नेहमी फ़्लेझीबल असतात, ताईसाहेब, काकासाहेब असे मधुर बोलतात. या उलट मराठी माणूस ताठ असतो व म्हणतो काय चुकले माझे बोला.
स्वतःच्या लढाया स्वतःच लढायच्या असतात, दुसऱ्यांच्या लढायांचे वर्णन ऐकताना त्याचे काय चुकले तो का पराभूत झाला, तो विजयी कसा झाला हे शोधण्यापेक्षा तो पराभूत झाला तर का पराभूत झाला, त्याच्या चुका कोणत्या हे शोधा आणि त्यातनं त्या इतिहासातून आपण आपल्या लढाया लढायच्या असतात.
आज आपण भारतासारख्या देशात आहोत, एका बाजूने आतिशय भ्रष्ट आचरणाने देश रसातळाला चालला आहे असे असताना त्याच वेळेला आपल्याकडे दुसरी ताकद म्हणजे जगातील सर्वात तरुण लोकसंख्या ही जगात कोठेही नाही ती भारतात आहे. जगातले सर्वात जास्त तरुण आज भारतात आहेत. जगात सर्वाधिक इंग्रजी बोलणारे आपल्या देशात आहेत ह्या काही आपल्या भक्कम बाजू आहेत, त्यामुळे बिझनेस करणाऱ्याला काही मरण नाही.
बिझनेस मध्ये तुम्हाला तुमचा कस्टमर ओळखता आला पाहिजे, तुम्हाला तुमचे आयुष्य ओळखता यायला पाहिजे आणि त्याला अनुसरून बिझनेस करता यायला पाहिजे. नेहमी आपल्या कस्टमरचा अभ्यास करा. मित्रांनो लक्षात घ्या, तुमचा कोणताही बिझनेस असू द्या जर तुमचे ऑफिस असेल तर ते नेहमी स्वच्छ क्लीन नीट नेटके ठेवा यावर सुद्धा तुमच्या बिझनेसचे यश अवलंबून असत.
धंद्यामध्ये मार्केटिंग खूप महत्वाचे. धंद्यामधे विकणारा सर्वात महत्वाचा भाग असतो. जर तुम्हाला व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर तर काहीना काही तरी विकायची पहिल्यापासून सवय ठेवा. विनोदाचा भाग सोडून द्या, पण तुम्हाला टकलू माणसाला सुद्धा कंगवा विकता आला पाहिजे. काहीना काही विकण्याचा आत्मविश्वास निर्माण करा मग तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता.
व्यवसायात प्रेझेंटेशन सुद्धा खूप महत्वाचे. सुरवातीच्या काळात मला किर्लोसकरांनी १०० रु दिले होते, चांगले कपडे, बूट व टाय घेण्यासाठी. तेव्हापासून मित्रांनो ही टाय जी माझ्या गळाल्या लागली आहे ती अजूनही आहे. मी नेहमी कुठेही जाताना व्यवस्तिथ नीटनेटके कपडे घालून जातो. तुमचा पेहरावा असा असला पाहिजे की तुम्ही समोरच्याला आपलेसे वाटले पाहिजे. तुमचे व्यक्तिमत्व इतके स्वच्छ पाहिजे की तुमच्या वागण्या बोलण्यातून लोकांना तुमच्याबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे.
मित्रांनो विहिरीत, ओढ्यात, स्विमिंग पूल / डबक्यात किती दिवस पोहायचे? नदीकडे आपण जायला हवे व पुढे समुद्राचे ध्येय ठेवले पाहिजे. रोज तुम्हाला बिझनेसला पैसे कमी पडत असतील तर समजा तुम्ही प्रगती करत आहात, आणि जर तुमचे पैसे उरत असतील लक्षात ठेवा तुम्ही धोक्याच्या दिशेने जात आहात. दरवर्षी तुमचा १० टक्केने बिझनेस वाढलाच पाहिजे, तुमची ग्रोथ झालीच पाहिजे.
Comments
Post a Comment