Pola the Festival of worship toward livestock animal... पोळा गित... बहिणाबाई चौधरी
पोया (पोळा)
आला आला शेतकर्या
पोयाचा रे सन मोठा
हातीं घेईसन वाट्या
आतां शेंदूराले घोटा
आतां बांधा रे तोरनं
सजवा रे घरदार
करा आंघोयी बैलाच्या
लावा शिंगाले शेंदुर
लावा शेंदूर शिंगाले
शेंव्या घुंगराच्या लावा
गयामधीं बांधा जीला
घंट्या घुंगरू मिरवा
बांधा कवड्याचा गेठा
आंगावर्हे झूल छान
माथां रेसमाचे गोंडे
चारी पायांत पैंजन
उठा उठा बह्यनाई,
चुल्हे पेटवा पेटवा
आज बैलाले नीवद
पुरनाच्या पोया ठेवा
वढे नागर वखर
नहीं कष्टाले गनती
पीक शेतकर्या हातीं
याच्या जीवावर शेतीं
उभे कामाचे ढिगारे
बैल कामदार बंदा
याले कहीनाथे झूल
दानचार्याचाज मिंधा
चुल्हा पेटवा पेटवा
उठा उठा आयाबाया
आज बैलाले खुराक
रांधा पुरनाच्या पोया
खाऊं द्या रे पोटभरी
होऊं द्यारे मगदूल
बशीसनी यायभरी
आज करूं या बागूल
आतां ऐक मनांतलं
माझं येळीचं सांगन
आज पोयाच्या सनाले
माझं येवढं मांगन
कसे बैल कुदाळता
आदाबादीची आवड
वझं शिंगाले बांधतां
बाशिंगाचं डोईजड
नका हेंडालूं बैलाले
माझं ऐका रे जरासं
व्हते आपली हाऊस
आन बैलाले तरास
आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचं देनं
बैला, खरा तुझा सन
शेतकर्या तुझं रीन !
– बहीणाबाई चौधरी
Comments
Post a Comment