Article on dirty politics... राजकारणी अव्यवस्था

राजकारणी अव्यवस्था



मी घरगुती गॅस वरील सबसीडी का सोडू?
Mangalore Today News Network चे सुमीत राव यांचे पंतप्रधानांना खुले पत्र.
(इंग्रजी मजकुराचे भाषांतर)..

आदरणीय महोदय, 

भारतातील आर्थीकदृष्ट्या संपन्न व श्रीमंत लोकांनी भारताच्या उत्कर्षाकरीता घरगुती गॅस सिलेंडर वरील मिळणा-या सबसीडीचा त्याग करावा असे आवाहन आपण केलेले आहे.
आपल्या या मताचा मी आदर करित ही कृती अगदी आनंदाने करेल. परंतु या बदल्यात आमचा देश चालविणा-या आपणा सर्व आदरणीय व्यक्‍तींकडून आम्ही काही माफक अपेक्षाही करतो.
जर प्रत्येक नगरसेवक, आमदार-खासदार, मंत्री अशाच प्रकारे गॅस सिलेंडर वरील मिळणा-या सबसीडीचा त्याग करणार असतील तर आम्ही सर्व भारतीय आपणावर अभिमान बाळगू व आपणास सलाम सुद्धा करू.
अशा कृतीने आपणा  सर्व लोकप्रतिनिधींना सर्व भारतीयांसमोर आदर्शवादाचा एक चांगला नमूना ठेवता येइल.
आपल्या सर्वांना सत्तेमुळे मिळालेल्या विशेष सुविधांचा त्याग करुन आमच्या गलितगात्र अनेक भाउबंदांच्या आर्थिक उन्नतीचा  विचार आपण करण्याचा दिवस कधी उजाडेल का?
संसदेमध्ये अनेक मुद्द्यांवर आपण एकमेकांशी कट्टरतेने भांडत असताना मात्र तुमच्या भत्त्यांमध्ये वाढ व्हावी याकरीता अगदी विनावीरोध आपण सर्व जण मतदान करता, हे कधी थांबणार काय?
आपआपल्या राजकीय पार्टी च्या फायद्याचे निर्णय घेण्याएवजी विधायक मुद्द्याकरीता भांडुन जबाबदार नागरिकां सारखे आपण कधी वागणार आहात का?
मी आपल्या निदर्शनास अत्यंत नम्रपणे आणू इच्छितो की जगात महासत्ता असलेल्या जर्मनी या देशाच्या पंतप्रधान श्रीमती अँजेला मार्केल आजही कार्यालयात जाताना सार्वजनिक रेल्वेने प्रवास करतात. आमच्या देशात मात्र खुद्द पंतप्रधान, खासदार एवढेच काय तर जिल्हा परिषदांचे अध्यक्ष या प्रत्येकाला सामान्य करदात्याच्या योगदानातून जमा झालेल्या शासकीय तिजोरीतून विकत घेतलेली वाहने उपलब्ध करून दिल्या जातात.
दूरध्वनी, विद्युत बिल, राजेशाही सरकारी बंगले, इत्यादीवर तुम्हा सर्वांचा होणारा भरपूर खर्च, सार्वजनिक वाहतुकीत होणारा आपला मोफत प्रवास, क्षुद्र कारणाखाली मौजेखातर केलेले परदेश दौरे याकरिता आम्हा सर्व भारतीयांनाच स्वत:च्या खिशाला खार लावावा लागतो ना.
आपण या सर्व खर्चांकरिता स्वत:चा पैसा खर्च करून एक जबाबदार भारतीय असल्याचा स्वाभिमान कधी बाळगणार?
तुम्ही लोक अगदी क्षुल्लक डोकेदुखी करीताहि पंचतारांकित इस्पितळात दाखल होता. त्यातल्या त्यात आपणा कुणा विरुद्ध एखाद्या अपराधा साठी जेव्हा एखादी चौकशी सुरू असते तेव्हा तर हमखास. तेथे आपणास विनासायास उत्तम सुश्रुषा अगदी मोफत उपलब्ध होते.
मला कृपया उत्तर दया साहेब की या सर्व विशेष सेवांकरिता आपण लोक कधी स्वत:ची दमडी खर्च करणार का?
जेव्हा आपण शासकीय दौ-यावर नसता तेव्हाही अनेकदा रेल्वेच्या वातानुकुलित बोगित आणि विमानाच्या महागड्या प्रथम दर्जाच्या वर्गात प्रवास करता. या आपल्या खर्चाकरीता आम्ही सर्व भारतीयच पैसा देतो ना.
अनेकांना सरकारी सुरक्षेची काहीही गरज नसताना केवळ आरडाओरड करून चमकोगिरि साठी झेड सुरक्षेची अवास्तव मागणी केली जाते. तुमच्या या निरर्थक सुरक्षेकरिता आम्हा भारतीयांचाच खिसा रिकामा होतो.
काळाचे किती विडंबन आहे बघा ना, की तुम्ही देशाची सुरक्षा करण्याएवजी आम्हा साधारण नागरिकांच्या पैशातून तुमचीच सुरक्षा करावी लागते.
काही भारतीय आजही एका वेळच्या जेवणाकरीता खर्च करण्याजोगे समर्थ नाही आणि याबाबत तक्रार करण्याएवढी त्यांच्यात ताकदही नाही. मात्र आपणा लोकांना केवळ एका रुपयात कॉफी वा बारा रुपयात पूर्ण भोजन संसदेच्या छान वातानुकुलित उपाहारगृहाच्या आल्हाददायक वातावरणात उपलब्ध होते. तुम्हा सर्वांना या क्षुल्लक बाबीकरिता काहीच वाटत नाही हे जास्त वेदनादायी आहे.
या सवलतीच्या दरात आपल्याला मिळणा-या भोजनाच्या खर्चाचा भार सामान्य देशवासियांवर लादण्याएवजी आपण हा आर्थिक भार कधी सोसणार का?
साहेब मी अगदी साधारण नागरीक असून  माझ्या कमाईच्या जवळपास ५० टक्के रक्कम ही आयकर, सेवा शुल्क, VAT, संपत्ती कर,  वाहन नोंदणी शुल्क, मालमत्ता कर अगदी इमाने इतबारे नियमीत भरतो. तुम्ही लोक मात्र या सर्व बाबींमधून सवलत प्राप्त करून आरामात मजा करता.
आपणच निर्माण केलेल्या नियमानुसार तुम्हा सर्वांना बहाल केलेल्या अवांतर सोयी सवलतींचा जेव्हा आपण त्याग कराल तो दिवस या देशाकरीता निश्चितच अभिमानाचा असेल.
जनतेनी हे राष्ट्र चालविण्याकरीता आपणा सर्व सदगृहस्थांना निवडून दिलेले आहे. ज्या दिवशी आपण सर्वजण जबाबदार भारतीय नागरिकांसारखे वागाल तो दिवस या देशाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल यात अजिबात शंका नाही. आणि हो, त्यादिवशी आम्ही सर्वजण गॅस वरील सबसीडी घेणे स्वत:च थांबवु.
आपला विश्वासू,

एक प्रामाणिक आणि जबाबदार नागरीक...

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!