भेंडी लागवड नियोजन असे कराल

भेंडी लागवड नियोजन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥भेंडी पिकाची लागवड मुख्यतः खरीप आणि उन्हाळी हंगामात करतात; परंतु अलीकडे रब्बी हंगामातही भेंडीची लागवड होते, त्यामुळे आपल्याला वर्षभर भेंडी बाजारात उपलब्ध असते.

♥भेंडीच्या अधिक उत्पादनासाठी "फुले उत्कर्षा' या वाणाची निवड उन्हाळी लागवडीसाठी फायदेशीर ठरेल. पश्‍चिम महाराष्ट्रात भेंडीच्या परभणी क्रांती आणि अर्का अनामिका या प्रचलित वाणांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते.

♥महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत पुण्याच्या गणेशखिंड येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पातून "फुले उत्कर्षा' हा नवीन वाण संकर करून निवड पद्धतीने सरळ वाण म्हणून विकसित केला आहे.

♥फुले उत्कर्षा हा वाण अधिक उत्पादन देणारा आणि कीड व रोगास कमी बळी पडणारा आहे.

♥प्रामुख्याने "यलोव्हेन मोझॅक' या विषाणूजन्य रोगास प्रचलित वाणांपेक्षा तो कमी बळी पडतो. या वाणास जमिनीपासून चौथ्या ते पाचव्या पे-यापासून फुले येण्यास सुरवात होते.

♥जास्त उंची, 50 टक्के फुलोऱ्याचा कालावधी 44 दिवस, प्रथम तोडणी 48 ते 50 दिवस, फळांची लांबी 10 ते 12 सें.मी., फळे हिरव्या रंगाची, पाचधारी, चमकदार, कोवळी, सरळ असून पिकाचा कालावधी 100 ते 110 दिवस आहे.

♥भेंडी पिकास उष्ण हवामान चांगले मानवते.
साधारणतः 20 ते 40 अंश सेल्सिअस तापमानात या पिकाची वाढ चांगली होते.

♥तापमान 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास बियांची उगवण कमी होते.

♥या पिकास हलक्‍या ते मध्यम किंवा भारी काळ्या जमिनी चालतात.
उन्हाळी हंगामात लागवड करताना चांगली पाणी धरून ठेवणारी, तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.

♥प्रथम जमिनीची नांगरट करून ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर उभ्या-आडव्या दोन कुळवांच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

♥शेवटच्या कुळवाच्या पाळीअगोदर प्रति हेक्‍टर 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे, म्हणजे जमिनीत ते चांगले मिसळले जाईल.

♥उन्हाळी हंगामासाठी भेंडीची लागवड फेब्रुवारी अखेरपर्यंत करावी.

♥60 सें.मी. अंतरावर सरी पाडून सरीच्या दोन्ही बाजूंस टोकण पद्धतीने 30 15 सें.मी. अंतरावर भेंडीची लागवड करावी.

♥लागवडीसाठी प्रति हेक्‍टरी 15 किलो बियाणे वापरावे.

♥मर रोगाच्या नियंत्रणासाठी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम अथवा कार्बेन्डॅझिम किंवा पावडर स्वरूपातील ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम चोळावे.

♥भेंडी पिकास मातीतील अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेप्रमाणे हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे.

♥यापैकी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावे. राहिलेले अर्धे नत्र लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावे.

♥उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी दर पाचव्या किंवा सहाव्या दिवशी पाणी द्यावे.

♥लागवडीनंतर उगवण पूर्ण झाल्यावर जरुरीप्रमाणे खुरपणी करावी व पीक तणमुक्त ठेवावे. फळे लागण्याच्या सुमारास भेंडीच्या खोडाला मातीची भर द्यावी.

♥कीड व रोगनियंत्रण -

भेंडी या पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फळ अळी व लाल कोळी या किडींचा उपद्रव होतो.

♥पीक उगवताच त्याभोवती
थायमेट अगर फ्युराडान 10 जी बुंध्याजवळ टाकावे
किंवा
थायमेथोक्‍झाम 25 टक्के डब्ल्यू. जी. 5 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून
दर 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

♥भेंडीवरील भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे गंधक 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

♥भेंडी तोडणी सुरू झाल्यावर मात्र कडुनिंबापासून बनविलेली कीडनाशकेच वापरावीत. वरीलप्रमाणे सुधारित पीक उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास फुले उत्कर्षा या वाणाचे प्रति हेक्‍टरी सरासरी 200 ते 230 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!