द्राक्ष बागेत पाने पिवळी दिसत असल्यास करावयाचे उपाय

द्राक्ष बागेत पाने पिवळी दिसत असल्यास
करावयाचे उपाय♥प्रगतशील शेतकरी♥

द्राक्ष बागेत फळछाटणीच्या 45 व्या दिवशी देठ परीक्षण करून घ्यावे. ज्या बागेत शेंडावाढ भरपूर होत असताना पाने पिवळी दिसत असतील तर वेलीमध्ये नत्राची कमतरता नसून ती फेरसची कमतरता असू शकते. मण्याच्या विकासामध्ये स्लरीचा (शेण रबडी) वापर फार महत्त्वाचा आहे.

द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थितीत वातावरण मोकळे दिसत असून वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत या पोषक अशा वातावरणाचा नक्कीच फायदा होऊन घडाच्या विकासात मदत होईल. पुढील काळात थंडी सुरू झाल्यास ऐन घडाच्या विकासाच्या वेळी म्हणजेच जवळपास पाणी उतरण्याच्या वेळी अडचणी येऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीत बागेत काय कार्यवाही करावी. याबद्दलची माहिती खालील लेखामध्ये दिली आहे.

बागेत पाने पिवळी दिसणे -
उशिरा छाटणी झालेल्या द्राक्ष बागेत प्रीब्लूम अवस्थेत कधी कधी पाने निस्तेज दिसतात. याचसोबत काही प्रमाणात पाने पिवळी दिसून येतात. खरे तर सुरवातीच्या काळात नत्र व पाणी भरपूर प्रमाणात दिल्या जाते. बाग उशिरा छाटली जाते अशावेळी वातावरणसुद्धा चांगले असते. पाऊस नसल्यामुळे बोदातून अन्नद्रव्याचे लिचिंग होण्याची शक्‍यता कमी असते. त्यामुळे अशा अवस्थेतील बागेत कुठल्याही प्रकारची कमतरता पानांवर दिसून यायला नको. परंतु जर द्राक्षवेलीला आवश्‍यक तेवढे अन्नद्रव्य दिलेले नसेल अशा अवस्थेत कमतरता दिसतेच.

बागेत काडीवर शेंडावाढ होत नाही, पाने पिवळी व निस्तेज दिसत आहे अशा परिस्थितीत कदाचित नत्राची उपलब्धता वेलीला झाली नसावी. अशावेळी प्रीब्लूम अवस्थेतील बागेत नत्राची फवारणी व ठिबकमधून सुद्धा उपलब्धता करून देणे फायद्याचे होते. परंतु ज्या बागेत शेंडावाढ भरपूर होत आहे, तरी पण पाने पिवळी दिसत आहे, अशा बागेत मात्र वेलीमध्ये नत्राची कमतरता नसून ती फेरसची कमतरता नक्कीच असू शकेल. या वेळी बागेत फेरस सल्फेटची फवारणी व जमिनीतून उपलब्धता महत्त्वाची असेल. वेलीला सूक्ष्म अन्नद्रव्य जरी फार कमी प्रमाणात लागत असली तरी मण्याच्या विकासावर बऱ्यापैकी त्याचा परिणाम दिसून येतो. याकरिताच बागेत फळछाटणीच्या 45 व्या दिवशी देठ परीक्षण करून घेणे महत्त्वाचे आहे. या कालावधीत मण्यांचा विकास नुकताच सुरू व्हायला लागतो. या वेळी वेलीमध्ये कमी असलेल्या अन्नद्रव्यांची कमतरता माहीत झाल्यास त्याची लगेच उपलब्धता करून पुढील अडचणी टाळता येतात.

मण्याचा विकास व स्लरीचा वापर -
मण्याच्या विकासामध्ये स्लरीचा (शेण रबडी) वापर फार महत्त्वाचा आहे. आपण सुरवातीस चारी घेऊन त्यामध्ये शेणखत टाकून चारी बंद करतो. हे खत हळूहळू पाण्याद्वारे वेलीला उपलब्ध होते. त्याचाच परिणाम घडाच्या विकासावर दिसून येतो. परंतु याच तुलनेत स्लरीचा वापर केल्यास ते वेलीला लवकर उपलब्ध होते, घडाच्या विकासात मदत करते. स्लरी तयार करताना कच्चे शेण पाण्यामध्ये चार-पाच दिवस सडविले जाते. यामुळे चिलेटेड रूपामध्ये उपलब्ध असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्याप्रमाणे या स्लरीची उपलब्धतासुद्धा होते. स्लरीमध्ये वेलीच्या वाढीच्या अवस्थेनुसार आवश्‍यक असलेले अन्नद्रव्य मिसळून कुजल्यानंतर त्यामध्ये आवश्‍यक त्या प्रमाणात पाणी मिसळवून प्रत्येक ड्रीपरच्या खाली अर्धा लिटर याप्रमाणे दिल्यास त्याचा मण्यांच्या विकासावर चांगले परिणाम दिसून येतात. विशेष म्हणजे मण्याचा आकार वाढतो, मण्यावर चमक दिसते. यामुळे बाजारात अशा द्राक्षांची मागणी चांगली असते. स्लरी दिल्यामुळे बोदावर आच्छादनासारखा काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. फळछाटणीनंतर आवश्‍यक त्या प्रमाणात सात-आठ वेळा बागेत स्लरीचा वापर केल्यास मण्याचा विकास चांगला होत असल्याचे आढळून येते.

साधारण परिस्थितीमध्ये स्लरीचा वापर -
पहिली स्लरी - दोन घमेली कच्चे शेण + 20 लिटर गोमूत्र + 5 किलो युरिया - हे 200 लिटर पाण्यामध्ये चार-पाच दिवस सडू द्यावे. यानंतर यामध्ये 600 लिटर पाणी घालून पूर्ण 800 लिटर एक लिटर प्रत्येक वेलीप्रमाणे एक एकरमध्ये पुरेल.
दुसरी स्लरी - दोन घमेली कच्चे शेण + 20 लिटर गोमूत्र + पाच किलो युरिया + तीन-चार किलो फेरस सल्फेट + 200 लिटर पाणी.
तिसरी स्लरी - शेणखत + गोमूत्र + पाच किलो सुपर फॉस्फेट + तीन-चार किलो मॅग्नेशिअम सल्फेट + 200 लिटर पाणी.
चौथी स्लरी - शेणखत + गोमूत्र + पाच किलो सुपर फॉस्फेट किंवा पाच किलो डीएपी + दोन किलो झिंक सल्फेट + 200 लिटर पाणी.
पाचवी स्लरी - शेणखत + गोमूत्र + पाच किलो पोटॅश + 200 लिटर पाणी.
सहावी स्लरी - शेणखत + गोमूत्र + पाच किलो पोटॅश + 200 लिटर पाणी.
टीप - वरील दिलेले स्लरीचे प्रमाण हे संशोधनाचे अनुमान नसून आपल्या बागेत साधारण परिस्थितीत काम करेल. वाढीच्या अवस्थेनुसार व बागेतील परिस्थिती पाहून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खताची मात्रा कमी- अधिक करावी.

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!