श्रीदत्तसंप्रदाय Shree Datta Sampraday ... Sadguru Parampara ...
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्रातील बहुतांश भक्तपरिवार हा श्रीविठ्ठलसंप्रदाय आणि श्रीदत्तसंप्रदाय यांमध्ये विभागलेला आढळतो. बहुसंख्य लोकांचा ओढाही याच दोन संप्रदायांकडे असलेला दिसेल. श्रीदत्त संप्रदायामध्ये स्वामीसमर्थ अक्कलकोटकर ' श्रीदत्तावतार ' म्हणून प्रसिद्ध आहेत आणि अधिक बारकाईने अभ्यास केल्यास महाराष्ट्रातील बऱ्याचशा संत - सत्पुरूषांचे मूळस्थान स्वामी समर्थांपाशी येऊन थांबते. श्री गजानन महाराजांविषयी श्री देवमामलेदार यांच्या चरित्रात असा उल्लेख आहे की, शेगांव येथे प्रकट होण्यापूर्वी महाराज अक्कलकोट येथे स्वामी समर्थांकडे काही दिवस मुक्कामास होते.
स्वामीसमर्थांनी तारुण्यावस्थेतील गजानन महाराजांना आध्यात्मिक कार्याची दिशा दाखविण्यासाठी सटाणा येथील थोर सत्पुरूष श्रीदेव मामलेदार यांच्याकडे पाठवले. देव मामलेदारांनी महाराजांची अध्यात्मविषयक जाणीव समृद्ध केली आणि पुढील कार्याची दिशा व स्वरूप स्पष्ट करून सांगितले. त्यांच्याच सूचनेनुसार महाराजांनी इगतपुरीजवळील मुकना नाल्यापाशी असलेल्या कपिलधारा तीर्थावर तप केले आणि पुढे आपले कार्यक्षेत्र शेगांव येथे निश्चित केले.
स्वामी समर्थांचा संबंध आणखी एका कारणाने महत्त्वाचा मानला जातो. १८७८ साली स्वामी समर्थ अक्कलकोट येथे समाधिस्थ झाले आणि त्याचवर्षी गजानन महाराज शेगांव येथे प्रकट झाले. त्यामुळे श्रीगजानन महाराज हे स्वामी समर्थ संप्रदायातील एक महत्त्वाचे सत्पुरूष होते , हे नि:संशय. त्यांचा हा प्रकटदिन शेगांवमध्ये उत्साहात साजरा केला जातो. महाराजांचे भक्त आज देशभरच नव्हे तर परदेशातही पसरलेले आढळतात. ते हा प्रकटदिन भक्तिभावाने साजरा करतात.
सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी , रापलेला तांबूस वर्ण , तुरळक दाढी व केस , वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात यातून साकारते ती श्रीगजानन महाराजांची देहचर्या . लांब लांब पावले टाकीत सदानकदा घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती , पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व त्यास छापी ( कपडा ) गुंडाळलेली. महाराजांची अशी मूर्ती लगबगीने एखाद्याच्या घरात घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावे अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे , अशी बालसुलभ वृत्ती.
महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा , हिरव्या मिरच्या , पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्नभावाने त्याचेही सेवन करावे. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी. महाराजांच्या वागण्याला धरबंध नव्हता.
भक्तांकडून साग्रसंगीत षोडशोपचारे पूजा करून घ्यावी तर कधी आंघोळीशिवाय कित्येक दिवस राहावे, तर कधी गळ्यात पडणारे हारही भिरकावून द्यावे अशी बालोन्मतपिशाच्च वृत्ती. मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात . मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहान लहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये गुंग होऊन जात. महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते. चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत.
महाराजांना कपड्याचे आकर्षण वा सोस नव्हता. कोणी अंगावर शाल पांघरली तर मनात असेल तोपर्यंत ठेवत नाहीतर ती फेकून देत असत. पादुका, पादत्राणे त्यांनी कधी वापरलीच नाहीत. बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावत आणि मग घरी त्यांची स्थापना करीत. मात्र महाराजांच्या नित्य वापरातल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या. इतकंच काय त्यांना चिलीम ओढण्याचीही फारशी सवय नव्हती. क्वाचितच ते चिलीम ओढीत असत. पण ३२ वर्षांच्या कालखंडात त्यांनी फार कमीवेळा चिलिमीला स्पर्श केला.
आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगांवमध्ये व्यतीत केला असला तरीही कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला , मलकापूर , नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे . उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश: धावावे लागे .
महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत . त्याचप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात. गोदावरीच्या तीरावर गोपाळदास महंत आणि माधवनाथ या त्यांच्या गुरूबंधूंशी त्यांची भेट होत असे . नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलंबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मागिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत. ब्रह्मागिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे. सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी दहावेळा विचार करावा लागतो. शे-सव्वाशे वर्षांपूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती. महाराज मात्र हा संपूर्ण पर्वत चढून जात असत. ब्रह्मागिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तिथे काही क्षण घलवत. नाथसंप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले आढळतात. त्याचे मूळ ब्रह्मागिरी पर्वतातच दडले असेल काय?
पुंडलिकबुवा भोकरे गजानन महाराजांची एक आठवण नेहमी सांगतात... शेगांवात एक वयस्कर स्त्री होती. शिधा मागून ती आपला उदरनिर्वाह करीत असे. गावकरी तिची भिकारीण म्हणून हेटाळणी करीत. ही स्त्री भिक्षेतून मिळालेल्या पिठाच्या भाकऱ्या करी व त्यातील एक महाराजांना देत असे. महाराजही ती भाकरी आवडीने खात. हा प्रकार काहीसा विचित्र आहे, असे मठातील अन्य भक्तांना वाटत असे. नैवेद्य म्हणून आलेले पंचपक्वान्नांची ताटे बाजूला सारून महाराज या वेडगळ भिकारणीच्या हातच्या भाकरीसाठी एवढे का तिष्ठत राहतात, याचे सर्वांना नवल वाटत असे. एकदा महाराजांच्या नकळत त्या स्त्रीने आणलेल्या भाकरीचा तुकडा पुंडलिक व अन्य भक्तांनी खाल्ला असता त्यांना तो अतिशय कडू लागला. महाराज इतक्या कडवट चवीची भाकरी आनंदाने खातात कसे , याचे त्यांना आश्चर्य वाटले .
एके दिवशी ही वेडगळ भिकारीण मेल्याचे वृत्त मठात आले. ते ऐकताच महाराजांच्या डोळ्यांना अश्रृधारा लागल्या. तीन दिवस महाराजांनी शोक केला. त्यांची ही कृती सर्वांना अगम्य वाटली. महाराजांनी जातीपातीचा, उच्चनीचतेचा, भेदभावाचा धर्म अंगीकारला नसल्याने प्रत्येकास त्यांच्या दर्शनास येण्याची मुभा होती. शेगांवातल्या एका वेश्येच्या ओसरीवर बसून महाराज तिच्या हातची भाकरी खात. तिला महाराज म्हणत, ' तू महानंदा आहेस.'
१९१० साली महाराज समाधिस्थ झाले तेव्हा असे म्हणतात की, शिर्डी येथे श्रीसाईबाबांनी आकांत मांडला. दिवसभर मौन बाळगून असलेल्या साईबाबांनी ' माझा भाऊ चालला ' असे कळवळून उद्गार काढले, असे दादासाहेब खापर्डे यांनी नमूद केले आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment