नामा म्हणे ... Namdev Said...
नामा म्हणे ... Namdev Said...
चक्रवाक पक्षी वियोगें बहाती ।
झालें मजप्रति तैसें आतां ॥१॥
चुकलीया माय बालकें रडती ।
झालें मजप्रति तैसें आतां ॥२॥
वत्स न देखतां गाई हंबरती ।
झालें मजप्रती तैसें आतां ॥३॥
जीवनावेगळे मत्स्य तळमळती ।
झालें मजप्रति तैसें आतां ॥४॥
नामा म्हणे मज ऐसें वाटे चित्तीं ।
करितसे खंती फार तूझी ॥५॥
डोलत डोलत टमकत चाले ।
गोजिरीं पाउलें टाकुनियां ॥१॥
पायीं रुणझुण वाजतात वाळे ।
गोपी पहातांत डोळे मन निवे ॥२॥
सांवळे सगुण मानस मोहन ।
गोपी रंजवण नामा म्हणे ॥३॥
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज विठ्ठल सांपडला ।
म्हणोनी कळिकाळां पाड नाही ॥४॥
देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥१॥
चरण न सोडी सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ॥२॥
वदनीं तुझे मंगलनाम । हृदयी अखंडित प्रेम ॥३॥
नामा म्हणे केशवराजा । केला पण हा चालवी माझा ॥४॥
देहुडा चरणीं वाजवितो वेणू ।
गोपिकारमणु स्वामी माझा ॥१॥
देखिला गे माय यमुनेचें तीरीं ।
हात खांद्यावरी राधिकेच्या ॥२॥
गुंजावर्ण डोळे शिरी बाबरझोटी ।
मयूर पुच्छ वेष्ठी शोभतसे ॥३॥
सगुण मेघ:श्याम लावण्य सुंदर ।
नामया दातार केशीराजा ॥४॥
नामाचा गजर गर्जे भीमातीर ।
महीमा साजे थोर तुज एका ॥१॥
ऋद्धी-सिद्धी दासी अंगण झाडिती ।
उच्छिष्ठे काढीती मुक्ती चारी ॥२॥
चारी वेद भाट होऊनी गर्जती ।
सनकादिक गाती कीर्ति तुझी ॥३॥
सुरवरांचे भार अंगणी लोळती ।
चरणरज क्षिति शिव वंदी ॥४॥
नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू ।
करितो सांभाळु अनाथांचा ॥५॥
पक्षिणी प्रभाति चारियासी जाये ।
पिलुवाट पाहे उपवासी ॥१॥
तैसे माझे मन धरी वो तुझी आस ।
चरण रात्रंदिवस चिंतितसे ॥२॥
तान्हे वत्स घरी बांधिलेस देवा ।
तया हृदयी धावा माऊलीचा ॥३॥
नामा म्हणे देवा तू माझा सोयरा ।
झणि मज अव्हेरा अनाथ नाथा ॥४॥
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा ।
करी अंग संगा, भक्ताचिया ॥१॥
भक्त कैवारीया होसी नारायणा ।
बोलता वचन काय लाज ॥२॥
मागे बहुतांचे फेडियले ऋण ।
आम्हांसाठी कोण आली धाड ॥३॥
वारंवार तुज लाज नाही देवा ।
बोल रे केशवा म्हणे नामा ॥४॥
पंढरीचा राजा उभा भक्तकाजा ।
उभारुनि भुजा वाट पाहे ॥१॥
घ्यारे नाम सुखें प्रेमें अलौकिक ।
साधनें आणिक करुं नका ॥२॥
मनाचेनि मनें ह्रदयीं मज धरा ।
वाचेनें उच्चारा नाम माझें ॥३॥
बोलोनियां ऐसे उभा भीमातीरीं ।
नामा निरंतरी चरणापाशीं ॥४॥
पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान ।
आणिक दर्शन विठोबाचे ॥१॥
हेची घडो मज जन्मजन्मांतरी ।
मागणे श्रीहरी नाही दुजे ॥२॥
मुखी नाम सदा संतांचे दर्शन ।
जनी जनार्दन ऐसा भाव ॥३॥
नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी ।
कीर्तन गजरी सप्रेमाचे ॥४॥
पंढरीची वारी जयाचिये कुळी ।
त्याची पायधुळी लागो मज ॥१॥
तेणे त्रिभुवनी होईन सरता ।
नलगे पुरुषार्था मुक्तिवारी ॥२॥
नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा ।
क्षण जीववेगळा न करी त्यांसी ॥३॥
नामा म्हणे माझा सोयरा जिवलग ।
सदा पांडुरंग तया जवळी ॥४॥
पंढरीचे जन अवघे पावन ।
ज्या जवळी निधान पांडुरंग ॥१॥
विठ्ठलनामें घेणें विठ्ठलनामें देणें ।
विठ्ठलनामें करणें सकळ काम ॥२॥
विठ्ठलनामी गोडी धरोनी आवडी ।
विठ्ठलनामीं बुडी दिल्ही जेणें ॥३॥
नामा म्हणे अवघें विठ्ठलचि झालें ।
विठ्ठलें दिधलें प्रेमसूख ॥४॥
प्रेमपिसें भरलें अंगीं ।
गीतेछंदे नाचों रंगीं ॥१॥
कोणे वेळे काय गाणें ।
हे तों भगवंता मी नेंणे ॥२॥
वारा धावे भलतया ।
तैसें माझी रंग छाया ॥३॥
टाळमृदंग दक्षिणेकडे ।
आम्ही गातो पश्चिमेकडे ॥४॥
बोले बाळक बोबडे ।
तरी ते जननीये आवडे ॥५॥
नामा म्हणे गा केशवा ।
जन्मोजन्मीं देईं सेवा ॥६॥
माझा भाव तुझे चरणी ।
तुझे रूप माझे नयनी ॥१॥
सापडलो एकामेकां ।
जन्मोजन्मी नोहे सुटका ॥२॥
त्वा मोडिली माझी माया ।
मी तो जडलो तुझिया पाया ॥३॥
त्वा मज मोकलिले विदेही ।
मी तुज घातले हृदयी ॥४॥
नामा म्हणे गा सुजाणा ।
सांग कोणे ठकविले कोणा ? ॥५॥
माझे मनोरथ पूर्ण करि देवा ।
केशवा माधवा नारायणा ॥१॥
नाही नाही मज आणिक सोयरा ।
न करी अव्हेरा पांडुरंगा ॥२॥
अनाथांच्या नाथा होशी तूं दयाळा ।
किती वेळोवेळां प्रार्थू आतां ॥३॥
नामा म्हणे जीव होतो कासावीस ।
केली तुझी आस आतां बरी ॥४॥
रूपे श्यामसुंदर निलोत्पल गाभा ।
सखिये स्वप्नी शोभा देखियेला ॥१॥
शंख-चक्र-गदा शोभती चहु करीं ।
सखिये गरुडावरी देखियेला ॥२॥
पीतांबर कटि दिव्य चंदन उटी ।
सखिये जगजेठी देखियेला ॥३॥
विचारता मानसी नये जो व्यक्तीसी ।
नामा केशवेसी लुब्धोनी गेला ॥४॥
विठ्ठल आवडी प्रेमभावो ।
विठ्ठल नामाचा रे टाहो ॥१॥
तुटला हा संदेहो ।
भवमूळ व्याधीचा ॥२॥
म्हणा नरहरी उच्चार ।
कृष्ण हरी श्रीधर ।
हेची नाम आम्हां सार ।
संसार करावया प्रेमभावो ॥३॥
नेणो नामाविण काही ।
विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलो पाही ।
विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥४॥
सुखाचें हे सुख श्रीहरी मुख ।
पाहतांही भूक तहान गेली ॥१॥
भेटली भेटली विठाई माऊली ।
वासना निवाली जिवांतील ॥२॥
चंद्रासी चकोर मेघासी मयूर ।
वाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥
नामा म्हणे पाप आणि ताप दुख: गेले ।
जाहलें हें सुख बोलवेना ॥४॥
नामाचा गजर गर्जे भीमातीर ।
महीमा साजे थोर तुज एका ॥१॥
ऋद्धी-सिद्धी दासी अंगण झाडिती ।
उच्छिष्ठे काढीती मुक्ती चारी ॥२॥
चारी वेद भाट होऊनी गर्जती ।
सनकादिक गाती कीर्ति तुझी ॥३॥
सुरवरांचे भार अंगणी लोळती ।
चरणरज क्षिति शिव वंदी ॥४॥
नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू ।
करितो सांभाळु अनाथांचा ॥५॥
Comments
Post a Comment