Must read The story of Arunima Sinha ... जिद्दी एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या अपंग स्त्रीची, 'पद्मश्री' प्राप्त जिद्दी अरुणिमा सिन्हाची ही साहसकथा.
एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या अपंग स्त्रीची, 'पद्मश्री' प्राप्त जिद्दी अरुणिमा सिन्हाची ही साहसकथा.
तिने प्रतिकार केला म्हणून चोरटय़ांना तिच्या गळ्यातली साखळी चोरता आली नाही परिणामवश त्यांनी तिला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले. समोरून येणाऱ्या ट्रेनने तिच्या पायाचा लचका तोडला. कृत्रिम पाय आणि कंबरेचं दुखणं तिचे सोबती झाले. त्याही अवस्थेत तिने एव्हरेस्ट चढून जाण्याचा विक्रम केला. मध्येच ऑक्सिजन संपलं. कृत्रिम पाय निखळला, तरीही ती जिवंत राहिली कारण समाजासाठी तिच्या हातून अनेक गोष्टी घडणं बाकी होतं. एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या अपंग स्त्रीची, 'पद्मश्री' प्राप्त जिद्दी अरुणिमा सिन्हाची ही साहसकथा.
११एप्रिल २०११. लखनौ रेल्वे स्थानकावर नेहमीचीच गर्दी! दिल्लीला जाण्यासाठी अरुणिमा पद्मावती एक्स्प्रेसमध्ये चढली. ट्रेनने वेग घेतला आणि चार-पाच रासवट तरुणांनी अचानक अरुणिमाचे सामान आणि गळ्यातली सोनसाखळी हिसकावण्याच्या हेतूने तिच्याशी झटापट सुरू केली. मुळातच क्रीडापटू असणाऱ्या तिनेही प्रतिकार सुरू केला. पण ती एकटी होती. ती दाद देत नाही असे लक्षात येताच त्या गुंडांचा अहंकार दुखावला. अपमानाने आणि संतापाने पेटून उठलेल्या त्या चार-पाच गुंडांनी तिला खेचत दरवाज्यापर्यंत आणले आणि चालत्या ट्रेनमधून तिला बाहेर फेकून दिले.. ती सात तास तशीच ट्रॅकवर पडून होती. या घटनेत तिने आपला एक पाय गमावला आणि कंबरेच्या हाडाचे दुखणे कायमचे मागे लागले.. पण तिची गोष्ट इथेच संपत नाही. तिने त्या कमतरतेवर मात केली. जिद्द आणि धाडसाच्या जोरावर 'एव्हरेस्ट' चढली. त्या अरुणिमाच्या या कर्तृत्वाचा सत्कार नुकताच भारत सरकारने केला तो 'पद्मश्री' देऊन!
अरुणिमाच्या तोंडून तिची हकीकत ऐकताना मन संतापाने पेटून उठते, विषण्णतेने झाकोळून जाते पण जसजशी तिची कहाणी पुढे सरकत जाते तसतसे तिच्याविषयी आश्चर्य, कौतुक आणि आदराचीच भावना मनात भरून राहते.
अरुणिमा सिन्हा! उत्तर प्रदेशमधल्या आंबेडकर नगर जिल्ह्य़ातली २३ वर्षीय तरुणी! तिचे वडील भारतीय सन्यदलात होते, पण ती जेमतेम सहा-सात वर्षांची असतानाच त्यांचे निधन झाले. वडिलांच्या जागी आईला नोकरीत सामावून घेतले गेले, पण तरीही आíथक परिस्थिती साधारणच होती. अरुणिमाला एक मोठी बहीण आणि एक धाकटा भाऊ आहे. अरुणिमा शालेय जीवनात उत्तम फुटबॉल आणि व्हॉलीबॉलपटू म्हणून नाव कमावून होती. पुढे अवध विद्यापीठातून कायद्याची पदवी घेत असताना तिने राष्ट्रीय स्पर्धामध्येही आपली चुणूक दाखवली. एलएल.बी.च्या शेवटच्या वर्षांला असतानाच तिने सेन्ट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता आणि त्यासाठीच्या पूर्वपरीक्षेसाठी ती दिल्लीला निघाली असतानाच ही घटना घडली आणि तिच्या आयुष्याने ३६० अंशात वळण घेतलं.
आजही 'त्या' घटनेविषयी सांगताना तिचा आवाज कापतो, हुंदके दाटतात. ''आईने माझ्यासाठी कौतुकाने बनवून घेतलेली सोनसाखळी सतत माझ्या गळ्यात असायची. प्रवासादरम्यान ती काढून ठेवावी हे मला सुचले नाही. माझ्या बोगीत असलेल्या काही भामटय़ांची नजर त्या साखळीवर पडली आणि त्यातल्या एकाने ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मी खेळाडू वृत्तीची आहे. सहजासहजी हार मानणे माझ्या रक्तात नाही. मी प्रतिकार सुरू केला. असेल नसेल त्या शक्तिनिशी मी त्यांना ठोसे, लाथा-बुक्क्यांचा चोप देऊ लागले. एक मुलगी आपल्याला आव्हान देते आहे हे त्यांच्या पुरुषी, पाशवी वृत्तीला मानवले नाही. त्यांनीही मला तेवढय़ाच क्रूरपणे मारहाण सुरू केली. अत्यंत दुर्दैवाची पण सत्य गोष्ट अशी की, बोगीतील इतर प्रवासी या सर्व प्रकारांकडे नुसतेच भेकडासारखे बघत राहिले. एकही जण माझ्या मदतीसाठी पुढे आला नाही.''
''मी ऐकत नाही आणि साखळी सहजासहजी सोडत नाही हे बघून म्हणा किंवा त्यांचा पुरुषी अहंकार दुखावला गेला म्हणून असेल, ते सारेच अतिशय संतापले.. त्यांनी मला खेचत खेचत दरवाज्यापाशी आणले आणि.. ट्रेनमधून निदर्यपणे खाली फेकून दिले.. मी दाणकन दोन रेल्वे ट्रॅकच्या मध्ये जोराने आदळले.. माझा पायातून आणि कंबरेतून प्राणांतिक कळा निघत होत्या. माझे हाडबिड मोडले की काय? मी असा विचारच करते आहे तो दुरून एक ट्रेन मला वेगाने येताना दिसली. माझा एक पाय नेमका त्याच ट्रॅकवर पडला होता. मी जिवाच्या कराराने पाय बाजूला घेण्याचा, तिथून उठण्याचा प्रयत्न करीत होते. पाय बाजूला सरकवणे तर दूरच पण माझी कंबर जराही उचलली गेली नाही. वेदनेचे आणखी एक मोहोळ उठले आणि त्यांच्या डंखांनी विदग्ध असतानाच ती ट्रेन धडधडत माझ्या पायावरून निघून गेली..''
रात्र असल्यामुळे अरुणिमा तशा अवस्थेत सात तास रेल्वे ट्रॅकवर पडून राहिली. आपल्या अर्धवट तुटलेल्या पायाचे लचके मोठमोठाल्या घुशी तोडत आहेत आणि ते असहाय्यपणे बघत राहावं लागलं.
आत्यंतिक रक्तस्रावाने विकल झालेल्या तिचा टाहो ऐकायला तिथे कोणीच नव्हतं. क्षीण आवाजात ती मदतीसाठी याचना करत राहिली आणि रात्री केव्हा तरी तिची शुद्ध हरपली. सकाळी उजाडल्यावर तिच्याकडे लोकांचे लक्ष गेले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या सात तासांच्या दरम्यान ४९ ट्रेन्सची ये-जा झाली असे पोलीस तपासात निष्पन्न झाले. माणसाच्या बत्थड, अप्पलपोटय़ा, भ्याड जाणिवा लखनौ दिल्ली रेल्वे मार्गावर त्या रात्री नागडय़ा झाल्या. त्या गाडीतल्या एकालाही पुढे जाऊन ती गाडी थांबवावीशी वाटली नाही की रेल्वे पोलिसांपर्यंत ही गोष्ट पोहोचवावीशी वाटली नाही. जगण्याचा मूलभूत हक्क, मानवाधिकार, महिला सुरक्षा आदी शब्दच्छल लीलया करणाऱ्या समाजाचे खरे चेहरे पुढे आले.
सात तासांच्या जीवघेण्या वेदनेनंतरही पठ्ठी जिवंत होती. भारतीय सनिकाची पोर होती ती इतक्या लवकर हार मानणार तरी कशी? तिच्या घरच्यांना कळवण्यात आले. तिचा पाय अर्धवट तुटला होता. तो अजून काही काळ तसाच राहता तर तिचे वाचणे अशक्य होते. तो कापायंला हवा, पण ऑपरेशनसाठी रक्त हवे होते. रक्त मिळवण्यासाठी घरच्या मंडळींचा आटापिटा आणि नंतर पदरी पडलेली आत्यंतिक निराशा. अरुणिमा सांगते, ''माझ्या घरातील मंडळींनी आमच्या नातेवाईकांना फोन केले. पण वाईट म्हणजे नातेवाईकांनी आपले फोन बंद करून ठेवले. रक्त द्यायला कोणीही आले नाही. हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनीच शेवटी मला रक्त दिले आणि माझे ऑपरेशन पार पडले.''
या दुर्घटनेची स्थानिक वृत्तपत्रातून वाच्यता झाल्यावरही उत्तर प्रदेश सरकारने तिच्याकडे ढुंकूनही पहिले नाही. तत्कालीन केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान, एका राष्ट्रीय खेळाडूवर दरोडेखोरांनी केलेला हल्ला आणि तिची एकूणच परिस्थिती आणि सरकारचा कोडगेपणा यावर माध्यमातून 'ब्रेकिंग न्यूज', चर्चा झडू लागल्या. जेव्हा अरुणिमाला लागणाऱ्या एकेका इंजेक्शनची किंमत २८ हजार रुपये होती तिथे सरकारची २५ आणि नंतरची २० हजारांची मदत कुठे पुरी पडणार होती. राष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूची राज्य आणि केंद्र सरकारांनी चालवलेली परवड, सुरक्षा व्यवस्थेचे निघालेले िधडवडे यावर माध्यमात वातावरण तापले.
शेवटी १८ एप्रिल २०११ ला अरुणिमाला दिल्लीच्या 'एम्स'मध्ये दाखल केले गेले आणि नंतर तिच्या संपूर्ण उपचारांची काळजी तत्कालीन केंद्र सरकारने घेतली. दिल्लीस्थित एका कंपनीने अरुणिमाला कृत्रिम पायासाठी अर्थसाहाय्य केले. माध्यमाच्या सततच्या भडिमारामुळेच मला ही मदत मिळाली, असं अरुणिमा प्रामाणिकपणे सांगते.
पण त्याच वेळी अरुणिमाची तक्रार हाताळताना उ. प्र. पोलिसांनी संवेदनहीनतेचा कळस गाठला. तिच्याजवळ तिकीट नसल्याने तिने ट्रेनमधून उडी मारली, तिने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी मारली असे अनेक आरोप तिच्यावर लावण्यात आले. पुराव्यानिशी तसे कुठेही सिद्ध झाले नाही आणि न्यायालयाने रेल्वे प्रशासनालाच दंड ठोठावत सहा लाख रुपये तिला ताबडतोब द्यावेत, असा आदेश दिला. कोर्टकचेऱ्या, पोलिसांच्या उलट तपासण्या हे सर्व अरुणिमाच्या 'एम्स'मधील चार महिन्यांच्या उपचारांदरम्यान घडत होते.
खोल निराशेचा आणि सततच्या वेदनांचा तो काळ होता. पोलिसांच्या प्रश्नांनी तर तळपायाची आग मस्तकात जात असे. मी मध्यमवर्गीय होते, एक मुलगी होते आणि आता तर अपंगत्वही आलेले. मला खोटे ठरवणे फार सोपे होते. पण त्या निराशेच्या खोल डोहातूनच माझ्या मनात ज्यांनी मला जगणे नाकारले, खोटे ठरवले त्यांना मी कोण आहे आणि काय करू शकते हे दाखवून देण्याची उत्कट ऊर्मी उसळून वर येत राही.'' अरुणिमा सांगते. पण अरुणिमाची जीवनकहाणी संपत नाही, ती खऱ्या अर्थाने सुरू होते..
''एक कृत्रिम पाय, दुसऱ्या पायात रॉड, कंबरेची हाडे पुरेशी जुळलेली नाहीत अशा अवस्थेत 'एम्स'मधले उपचार पूर्ण करून मी घरी आले. ईश्वराने मी काही तरी इतिहास रचावा म्हणून मला जिवंत ठेवले आहे, असे मला वाटत राही. त्या चार महिन्यांत मी जेवढी शरीराने विकलांग होत होते तेवढेच माझे मन स्वप्नांच्या भराऱ्या मारण्यात व्यग्र होते. हो, माझ्या मनात एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर चढून जाण्याची आस लागून राहिली. माझी एकूण शारीरिक अवस्था पाहता हा निव्वळ वेडेपणा होता. मला अनेकांनी तसे सुनावलेदेखील, पण माझी आई, भाऊ, बहीण आणि जिजाजी यांनी सदैव माझ्या इच्छा-आकांक्षांना उचित आदर दिला आहे. त्यांच्या प्रोत्साहनानेच मी माऊंटेनिअिरगच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदवलं.'' अरुणिमाच्या दुर्दम्य महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी तिला साथ मिळाली ती पहिली भारतीय महिला एव्हरेस्टवीर बचेंद्री पाल यांची. त्या तिच्या गुरुस्थानी आहेत. कर्करोगावर मात केलेल्या क्रिकेटपटू युवराजने देखील अरुणिमाला प्रोत्साहन दिले. 'टाटा स्टील अॅडव्हेन्चर फाऊंडेशन'च्या उत्तरकाशी कॅम्पमध्ये अरुणिमा प्रशिक्षणासाठी रुजू झाली. ते वर्ष होते २०१२.
''जेव्हा माझ्यासोबत सराव करणारी मंडळी आठ-आठ किलोमीटर पुढे निघून जात तेव्हा मी जेमतेम एखाद्या किलोमीटपर्यंत पोहोचलेली असे. पण बचेंद्री पाल यांनी मला सतत जाणीव करून दिली की, 'ज्या क्षणी एव्हरेस्ट चढून जाण्याची आकांक्षा माझ्यात उत्पन्न झाली त्या क्षणीच मी ते सर केले आहे. आता फक्त जगाला दाखवायचे होते!' माझ्या पायातून रक्तस्राव होत असे, कंबरही दुखून येई; परंतु बचेंद्री पालसारखी गुरू असल्यावर काय? त्या म्हणत, 'अरुणिमा, तू अपंग आहेस हे विसरून जा तरच ही मोहीम फत्ते होऊ शकते.'
२०१२ मध्ये एव्हरेस्टची पूर्वतयारी मानली जाते ते 'आयलँड पीक' (६१८९ मीटर्स उंचीवर) आणि एप्रिल २०१३ मध्ये चाम्सेर कांग्री (६६२० मीटर्स उंचीवर) अरुणिमाने पादाक्रांत केले. एव्हरेस्ट मोहीम सर करण्याची सुरुवात झाली होती..
'टाटा ग्रुप इको एव्हरेस्ट एक्सपेडिशन'अंतर्गत १ एप्रिल २०१३ ला सुरू केलेली तिची एव्हरेस्ट मोहीम पुढे ५२ दिवस खडतर मार्ग, प्रतिकूल हवामान, प्राणवायूचे सतत कमी कमी होत जाणे, बर्फाच्छादित पर्वत आणि त्यावरून घसरत जाणारा कृत्रिम पाय अशा अनेक अडचणींवर मात करत पुढे जात होती.
तिच्या या मोहिमेदरम्यानचे अनुभव अंगावर शहारे उभे करणारे आहेत. ''या वाटेवर तुम्हाला अनेक मृतदेह दिसतात. आपल्यासारखेच धाडस करणारी ही मंडळी अपयशी ठरली असतात आणि तरीही हिम्मत हरायची नसते.'' हिमालय चढायचाच हे तिने मनाशी ठाम ठरवले होते. एक एक पाय जिद्दीने ती पुढे टाकायची, तो रोवायचा प्रयत्न करायची पण दुसरा कृत्रिम पाय बर्फावरून घरंगळत खाली यायचा नि त्या परिस्थितीत स्वत:चा तोल सावरणं कठीण जायचं. तशाच अवस्थेत तिने कसे-बसे पुढचे अंतर कापले. तिला शिखर दिसू लागलं होतं, पण त्या दरम्यान तिच्या जवळचा ऑक्सिजन साठा जवळजवळ संपत आला होता. तिच्याबरोबरचा वाटाडय़ा थापा तिला सतत वापस खाली चालण्याचा आग्रह करत होता, पण अरुणिमा बधली नाही. आता एकच लक्ष्य!
अखेरीस अरुणिमाने तिच्या सोबत असलेल्या वाटाडय़ा थापासमवेत २१ मे २०१३ ला सकाळी १०.५५ ला एव्हरेस्ट शिखरावर भारताचा झेंडा फडकवला. ते एव्हरेस्ट शिखराच्या नियोजित स्थानी आले तसा तिने आपला एक फोटो काढायची विनंती केली तसा थापा संतापला. म्हणाला, ''तुझा ऑक्सिजन संपत आला आहे. तो कुठल्याही क्षणी संपेल आणि तू मरशील. अशा अवस्थेत फोटो काढणं तुला कसं काय सुचतंय?''आपला एव्हरेस्टवर भारतीय तिरंगा फडकावतानाचा एक तरी फोटो बेस कॅम्पवर पोहोचला पाहिजे हा अरुणिमाचा हट्टच होता. थापाने फोटो काढला. आता लवकरात लवकर खाली उतरलो नाही तर मृत्यू ठरलेला, आता तिला वाटलं फोटो पुरेसा नाही व्हिडीओच काढायला हवा.'' तिने थापाला सांगितलं. या वेळी कसं कुणास ठाऊक थापा काहीच बोलला नाही. त्याने एव्हरेस्टवर अभिमानाने तिरंगा फडकवणाऱ्या अरुणिमाचा संपूर्ण व्हिडीओ चित्रित केला आणि मगच ती दोघे खाली उतरू लागली..
खाली उतरताना आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो आहे म्हणजेच आपला ऑक्सिजन संपला आहे हे अरुणिमाच्या लक्षात आले. ती तिथेच थांबून कसा-बसा श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढय़ात थापाला दुसऱ्या एका गिर्यारोहकाने टाकून दिलेले एक ऑक्सिजन सििलडर दिसले आणि त्याने लगबगीने ते अरुणिमाला लावले.
''आाम्ही थोडे खाली आलो तो अचानक माझा कृत्रिम पाय निखळून पडला. तो लावत बसायला वेळ लागला असता. ऑक्सिजन असेपर्यंत खाली पोहोचणे आवश्यक होते. मग काय एका हाताने मी तो पाय ओढून धरून ठेवला आणि अक्षरश: जीव मुठीत धरून आम्ही खाली आलो. ''मी जगावे आणि आपली कथा जगाला सांगावी हेच त्या जगन्नियंत्याच्या मनात होते,'' अरुणिमा सांगते.
अरुणिमाची एव्हरेस्ट मोहीम अशा तऱ्हेने फत्ते झाली. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग स्त्री म्हणून आता राज्य आणि केंद्र सरकारला तिची दखल घेणे भाग होते. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी तिचे अभिनंदन केले आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही तिचा सन्मान करत तिला २५ लाख रुपये प्रदान केले. 'बॉर्न अगेन ऑन दि माऊंटेन' या तिच्या आत्मचरित्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
'भारत विकास ग्रुप' या पुणे स्थित कंपनीने अरुणिमाच्या संपूर्ण मोहिमेसाठी आíथक साहाय्य केले होते. आता तिची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. जगातील सात उच्चतम शिखरे लांघण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे. स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर आझाद यांचे गाव असलेल्या उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे विकलांग आणि तत्सम लोकांसाठी 'पंडित चंद्रशेखर खेल अॅकॅडमी' स्थापन करण्याच्या तिच्या हालचालींना आता वेग आला आहे.
नियतीच्या क्रूर तडाख्यांना तितक्याच समर्थपणे टोलवून यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेली अरुणिमा सिन्हा. दुर्दैवाचे इतके क्रूर वार झेलूनही कुठेही विचलित न झालेली तिची दुर्दम्य जीवननिष्ठा, आपले जीवन सार्थकी लावण्याची तिची ऊर्मी आणि याच दुर्दैवाच्या भट्टीतून तावून-सुलाखून निघालेलं हे निखळ, बावन्नकशी व्यक्तित्व! अरुणिमाच्या धर्याला, तपश्चय्रेला आणि शौर्याला सलाम!
शर्वरी जोशी
Comments
Post a Comment