शंकराची बारा ज्योतिर्लिंग Shankarachi Bara Jyotirling
शंकराची बारा ज्योतिर्लिंग : Shiv twelve (12) JyotirLing.
[१] सोमनाथ ( गुजरात – वेरावळ ) : Somnath ( Gujrat - Verawal )
हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. हे मंदिर एवढे वैभवशाली होते, गझनीच्या मोहम्मदाने त्यावर अनेकदा आक्रमण करून ते लुटले. या मंदिराचा विध्वंसही त्याने केला होता. नंतर मधल्या काळात इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनीही त्याच्या जीर्णोद्धाराला मदत केली होती. सध्या अस्तित्वात असलेले मंदिर हे भारताचे माजी पंतप्रधान व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नातून साकार झाले आहे. सातव्या वेळेले हे मंदिर बांधण्यात आले असून ते कैलास महामेरू प्रसाद शैलीत बनविले गेले आहे. हे मंदिर गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप या तीन प्रमुख भागांमध्ये आहे. याच्या शिखरावरील कलशाचे वजन दहा टन आहे. ध्वजाची उंची २७ फूट आहे.
[२] मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश – श्रीशैल्य)
श्रीशैल्यम् मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हैद्राबादपासून सुमारे २१० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पूर्व दिशेला नल्लमलाई डोंगर रांगात वसलेले हे (शिव) तीर्थक्षेत्र आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची ४७६ मीटर आहे. येथील जंगल सदाहरित प्रकारचे आहे. तसेच येथे कृष्णा नदीच्या (पाताळगंगेच्या) काठावर जाण्यासाठी रज्जूमार्ग आहे. येथे श्रीशैलम् धरण असून भव्य जलविद्युत निर्मिमीती केंद्र आहे.
[३] महांकालेश्वर (मध्यप्रदेश – उज्जैन)
महाकालेश्वर मंदिर मधील मूर्तीस बरेचदा दक्षिण मूर्ती म्हणून ओळखले जाते. कारण ती दक्षिण मुखी मूर्ती आहे. परंपरेनुसार महाकालेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. व सर्वात जास्त आस्थेचे मानले जाते. येथील लिंग महादेव तीर्थ स्थळाच्या वर स्थापित केले आहे. येथे गणेश पार्वती आणि कार्तिकेय देव यांच्या प्रतिमा पण आहेत. दक्षिन दिशेस प्रिय नांदी स्थापित केले आहे. असे म्हटले जाते कि, येथे बनविलेले नागचंद्रेश्वर मंदिर चे कपाट फक्त नागपंचमीस उघडले जातात.
[४] ओंकारेश्वर (मध्यप्रदेश – ओंकारेश्वर)
देवी अहिल्याबाई होळकर यांच्या काळापासून येथे एका विशिष्ट दिवशी मातीची १८ हजार शिवलिंगे तयार करून, पूजा केल्यानंतर त्यांचे नर्मदेत विसर्जित करण्याची प्रथा आहे..ओंकारेश्वर तीर्थ क्षेत्रामध्ये चोवीस अवतार, माता घाट (सेलानी), सीता वाटिका, धावड़ी कुंड, मार्कण्डेय शिला, मार्कण्डेय संन्यास आश्रम, अन्नपूर्णाश्रम, विज्ञान शाला, बड़े हनुमान, खेड़ापति हनुमान, ओंकार मठ, माता आनंदमयी आश्रम, ऋणमुक्तेश्वर महादेव, गायत्री माता मंदिर, सिद्धनाथ गौरी सोमनाथ, आड़े हनुमान, माता वैष्णोदेवी मंदिर, चाँद-सूरज दरवाजे, वीरखला, विष्णु मंदिर, ब्रह्मेश्वर मंदिर, शेगावचे गजानन महाराज यांचे मंदिर, काशी विश्वनाथ, नरसिंह टेकडी, कुबेरेश्वर महादेव, चन्द्रमोलेश्वर महादेवाचे मंदिरसुद्धा वगैरे देवळे आहेत.
[५] वैजनाथ ( महाराष्ट्र – परळी वैजनाथ )
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी मराठवाड्यातील परळीचे वैजनाथ पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते.मंदिर प्रशस्त तसेच चिरेबंदी आहे.मंदिर एका लहानशा टेकडीवर वसलेले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिणोद्धार केला आहे.जागृत देवस्थान असल्यामुळे श्रावणी सोमवारला येथे लाखो भाविकांची गर्दी होते.परळी हे तीर्थक्षेत्र बीड जिल्ह्यात आहे.
[६] भीमाशंकर (महाराष्ट्र – पुणे )
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे.. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे.
[७] रामेश्वर ( तामिळनाडू – रामेश्वरम)
रामेश्वरम हे भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक लहान शहर आहे. रामेश्वरम शहर तमिळनाडूच्या आग्नेय भागात मन्नारच्या आखातामध्ये स्थित असलेल्या रामेश्वरम द्वीपावर वसले आहे. रामेश्वरम श्रीलंकेच्या मन्नार द्वीपासून ५० किमी अंतरावर आहे. रामेश्वरममध्ये १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामनाथस्वामी मंदिर स्थित आहे. ह्यामुळे रामेश्वरम हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. रामायणामध्ये भगवान श्रीरामांनी रामेश्वरममधूनच लंकेमध्ये आपले सैन्य नेण्यासाठी रामसेतूची रचना केली होती. सध्या ह्या सेतूचे केवळ अवशेष शिल्लक असून एकेकाळी हा सेतू भारतीय उपखंडाला श्रीलंका बेटासोबत जोडणारा अखंड दुवा होता हे सिद्ध झाले आहे. रामेश्वरम रेल्वे स्थानक दक्षिण रेल्वेचे एक टर्मिनस असून चेन्नई व मदुराईहून येणारे रेल्वेमार्ग येथे संपतात.
[८] नागनाथ (महाराष्ट्र – औंढा नागनाथ )
भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणार्या नागनाथ (नागेश्वर) मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे. या गावात एकेकाळी आमर्दक सरोवर होते. हे मंदिर एका विस्तीर्ण २९०X१९० फुटी आवारात असून त्याभोवती एक मोठा परकोट आहे. परकोटाला चार प्रवेशद्वारे असून त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. तेच मुख्य प्रवेशद्वार होय. आवारातच एक पायविहीर असून तिचा नागतीर्थ असा उल्लेख केला जातो. सासू-सुनेची बारव असेही तिला म्हणतात. मुख्य मंदिराची लांबी १२६ फूट, रुंदी ११८ फूट आणि उंची ९६ फूट आहे. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहे. औंढा हे संत नामदेवाचे गुरु विसोबा खेचर यांचेही गाव आहे. त्यांची समाधी या परिसरातच आहे.
टीप : या ज्योतिर्लिंग बाबत काही मतभेद आहेत , काही लोक गुजरात मधील द्वारकेच्या जवळ असलेल्या नागेश्वर ला आठवे ज्योतिर्लिंग मानतात .
[९] विश्वेश्वर (उत्तर प्रदेश – वाराणसी)
वाराणसी (किंवा काशी, बनारस) हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. काशी, असी व वरुणा या नद्यांच्या संगमावर वसल्याने त्याला ‘वाराणसी’ हे नाव पडले. काशी हे हिंदूंना सर्वांत पूज्य असणारे क्षेत्र आहे. हे शहर बनारस, वाराणसी, काशी, अविमुक्त (शंकराच्या वास्तव्यामुळे), आनंदकानन/आनंदवन(शंकराला आनंद देणारे वन), काशिका, तपःस्थली, महास्मशान, मुक्तिक्षेत्र, रुद्रावास (रुद्राचे राहण्याचे ठिकाण), श्रीशिवपुरी वगैरे नावांनी ओळखले जाते. येथील काशी विश्वेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. गंगा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले वाराणसी जगातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते.
[१०] त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र – त्र्यंबकेश्वर)
त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे.
[११] केदारनाथ ( उत्तराखंड – केदारनाथ )
हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. गौरीकुंडहून १४ किलोमीटर (८.७ मैल) लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते.
[१२] घृष्णेश्वर ( महाराष्ट्र -औरंगाबाद)
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी औरंगाबादजवळील दौलताबादेपासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर असणारे घृष्णेश्वराचे पुरातन शिवमंदिर आहे.
लाल पाषाणात असलेल्या आणि अप्रतिम कोरीव काम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार सोळाव्या शतकात छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी तर अठराव्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केल्यामुळे मंदिर अजून सुस्थितीत आहे.
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
Comments
Post a Comment