Nile Phule Marathi best actor
'बाई वाड्यावर या' असे फरमावणा-या
या अस्सल खलनायकाचे खरे नाव नव्हते 'निळू'
मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील जातीवंत कलाकार अशी ओळख मिळवलेल्या व मराठी रसिक प्रेक्षकांवर चार दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे अभिनेते निळू फुले यांनी 13 जुलै 2009 म्हणजेच बरोबर या जगाचा निरोप घेतला होता. त्यांना जाऊन काही वर्षांचा काळ लोटला असली तरी निळू फुलेंचा करारी आवाज रसिकांच्या मानत कायम आहे.
जब्बार पटेलांच्या सिंहासन, सामना यातील भूमिकांनी निळूभाऊंनी दर्जेदार अभिनेते असल्याचे दाखवून दिले. चार दशकाच्या कारकिर्दीत मराठी-हिंदी अशा सुमारे दीडशे चित्रपटात त्यांनी काम केले. सखाराम बाईंडर या मराठी नाटकाने तर निळूभाऊंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. नाट्यरसिक आणि सिनेप्रेमींना कलाकार म्हणून प्रिय असलेल्या निळूभाऊंनी सेवादलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली.
भाजीपाला आणि लोखंड विकणा-या घरात जन्म झाला असला तरी आपल्या कर्तृत्त्वाने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्ठीत निळूभाऊंनी स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला. 'बाई वाड्यावर या' या पाटलांच्या भूमिकेतील डायलॉग तर आजही लोकांच्या मनामनात राहिला आहे. आपली भूमिका ठामपणे वठविणारे निळूभाऊंना महिलांचा रोष मात्र कायम पत्करावा लागला होता.
निळूभाऊंचा जन्म पुण्यातला. त्यांच्या जन्मतारखेविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाहीये. 1930 किंवा 1931 साली त्यांचा जन्म झाला असल्याचे म्हटले जाते. निळू फुले यांचे खरे नाव निलकांत कृष्णाजी फुले असे आहे. निलकांतवरुन त्यांचे निळू हे नाव पडले. पुढे सिनेसृष्टीत ते याच नावाने लोकप्रिय झाले. महात्मा जोतिबा फुलेंच्या घराण्याचा वारसा सांगणारे कृष्णाजी व सोनाई या दाम्पत्याच्या पोटी पुण्यात निळूभाऊंचा जन्म झाला. त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणार्या पैशावर चरितार्थ चालवत असत.
माळीकाम करायचे...
निळू फुलेंनी मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेतले. अगदी तरुणपणी वानवडीच्या लष्करी महाविद्यालयात त्यांना माळीकाम मिळालं. हे काम करताना त्यांना मनापासून आनंद मिळत होता. याच क्षेत्रात करिअर करायचा त्यांचा विचार होता. मात्र, आर्थिक अडचणीमुळं त्यांना नर्सरी उघडता आली नाही. तेव्हा मिळणाऱ्या 80 रुपये पगारातले दहा रुपये निळूभाऊ राष्ट्रसेवा दलाला देत होते.
नाट्यरसिक आणि सिनेप्रेमींना कलाकार म्हणून प्रिय असलेल्या निळूभाऊंनी सेवादलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही बरेच काम केले. सेवादलाच्या कलापथकाचे सदस्य असलेल्या निळू फुले यांनी 1958 च्या सुमारास पुण्यातील कलापथकाचे नेतृत्व केले.
असे आले अभिनय क्षेत्रात...
अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी 1957 च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी स्वतः 'येरा गबाळ्याचे काम नोहे' हा वग लिहिला. त्यानंतर पु. ल. देशपांडे यांच्या नाटकात 'रोंगे'ची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून खर्या अर्थाने पुढे आले. मग त्यांनी माळीकाम सोडून पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.
पहिली संधी...
राम नगरकरांसोबत त्यांनी 'कथा अकलेच्या कांद्याची' हे वगनाट्य गाजवलं. महाराष्ट्रभरात या जोडगोळीचं नाव झालं. अनंत मानेंच्या 'एक गाव बारा भानगडी' या तमाशापटात निळूभाऊंना सिनेमातील पहिला ब्रेक मिळाला. या सिनेमात त्यांनी साकारलेल्या 'महाबेरकी झेलेअण्णां'च्या भूमिकेनं त्यांना मराठी चित्रसृष्टीची कवाडं खुली झाली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले नाव...
1972 मध्ये निळूभाऊंना विजय तेंडुलकरांचं 'सखाराम बाइंडर' नाटक मिळालं आणि या नाटकानं इतिहास घडवला. निळूभाऊंच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड असं या नाटकाचं वर्णन करावं लागेल. खरं तर तेंडुलकर निळूभाऊंना सखाराम पेलवेल का, याविषयी साशंक होते. मात्र, कमलाकर सारंग निळू फुलेंच्याच नावावर ठाम होते. त्यांनी तेंडुलकरांना कथाचा प्रयोग दाखवला. त्यानंतर निळूभाऊंना हे काम मिळालं. बाइंडर आणि त्याचा पुढचा सगळा इतिहास सर्वज्ञात आहे. या नाटकानं निळूभाऊंना आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवून दिलं.
मराठी सिनेसृष्टीतील पदार्पण...
'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी पदार्पण केले आणि सलग 40 वर्षे या चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर कारकीर्द केली. निळू फुले यांनी 12 हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, तर मराठी भाषेतल्या जवळपास 140 चित्रपटांमधून काम केले आहे. त्यांच्या भूमिकांपैकी 'चोरीचा मामला', 'पुढचं पाऊल', 'शापित', 'सामना', 'सिंहासन' यांतील भूमिका विशेष गालल्या
अचुक होते निरीक्षण...
नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणार्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला. सहज सुंदर अभिनय करणार्या निळू फुलेंनी आपल्यातील कलाकार जिवंत केला.
'पिंजरा'तील भूमिका...
'पिंजरा' या गाजलेल्या सिनेमात निळू फुले यांची भूमिका तशी छोटी होती. मात्र, मास्तरांकडे पाहून केवळ कुत्सितपणे हसणं एवढीच कामगिरी त्यांनी अशी जबरदस्त साकारली होती.
खासगी आयुष्यात होते गंभीर प्रवृत्तीचे...
हिंदी चित्रपटातून त्यानी भूमिका साकारल्या तरी त्यांची ओळख मराठी चित्रपटाचे कलाकार अशी राहिली. पण बराच काळ खलनायक वा दृष्ट वृत्तीचे म्हणून ओळखले गेले. प्रत्यक्षात ते कमालीचे गंभीर प्रवृत्तीचे. वाचनातून त्यांची मूळ प्रवृत्ती अधिकच जपली गेली.
रमले नाहीत हिंदीत..
निळू फुलेंनी 12 हिंदी सिनेमेही केले. 'कुली'मध्ये ते अमिताभसमोर तेवढ्याच ताकदीनं उभे राहिले. महेश भटच्या 'सारांश'मध्येही त्यांना खलनायक साकारायला मिळाला. पण ते हिंदीत फार रमले नाहीत.
नाकारला महाराष्ट्र भूषण पुरस्कार...
निळू फुले यांचे महाराष्ट्राच्या चित्रपट, नाट्य क्षेत्रातच योगदान नाही तर सामाजिक क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केलेले आहे. सेवादलाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतले होते. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडाच नव्हता तर ते त्यांचे विचार प्रत्यक्ष जगत असत. त्यामुळेच राज्य शासनाने वर्ष 2003 मध्ये निळू फुले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे ठरवले होते. ही बाब निळूभाऊंना कळताच त्यांनी या पुरस्कार स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. एवढेच नाही तर या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तींची आणि समाजासाठी झोकून देणाऱ्यांची नावेही सूचवलीत.
निळू फुलेंचे गाजलेले मराठी सिनेमे...
अजब तुझे सरकार, आई (नवीन), आई उदे गं अंबाबाई, आघात, आयत्या बिळावर नागोबा, एक गाव बारा भानगडी, एक रात्र मंतरलेली, एक होता विदुषक, कडकलक्ष्मी, कळत नकळत, गणानं घुंगरू हरवलं, गल्ली ते दिल्ली, चटक चांदणी, चांडाळ चौकडी, चोरीचा मामला, जगावेगळी प्रेमकहाणी, जन्मठेप, जिद्द, जैत रे जैत, दिसतं तसं नसतं, दीड शहाणे, धरतीची लेकरं, नणंद भावजय, नाव मोठं लक्षण खोटं, पटली रे पटली, पदराच्या सावलीत, पायगुण, पिंजरा, पुत्रवती, पैज, पैजेचा विडा, प्रतिकार, फटाकडी, बन्याबापू, बायको असावी अशी, बिन कामाचा नवरा, भन्नाट भानू, भालू, भिंगरी, भुजंग, मानसा परीस मेंढरं बरी, मालमसाला, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, राघुमैना, राणीने डाव जिंकला, रानपाखरं, रावसाहेब, रिक्षावाली, लाखात अशी देखणी, लाथ मारीन तिथं पाणी, वरात, शापित, सतीची पुण्याई, सर्वसाक्षी, सवत, सहकारसम्राट, सामना, सासुरवाशीण, सोबती, सोयरीक, सिंहासन, सेनानी साने गुरूजी, सोंगाड्या, हर्या नार्या जिंदाबाद, हळदी कुंकू, हीच खरी दौलत.
गाजलेली लोकनाट्ये...
कथा अकलेच्या कांद्याची, कुणाचा कुणाला मेळ नाही, पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत, लवंगी मिरची कोल्हापूरची, ही त्यांची गाजलेली लोकनाट्ये आहेत.
गाजलेली नाटकं...
जंगली कबूतर,बेबी, रण दोघांचे, सखाराम बाईंडर, सूर्यास्त ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत.
शेवटचा चित्रपट...
'गोष्ट छोटी डोंगराएवढी' हा मकरंद अनासपुरेंसोबतचा निळूभाऊंचा शेवटचा चित्रपट ठरला.निळू फुले यांचे 13 जुलै 2009 रोजी पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले. अन्ननलिकेच्या कर्करोगाने अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Reference unknown
Comments
Post a Comment