नामा म्हणे ... Namdev Said...
नामा म्हणे ... Namdev Said... चक्रवाक पक्षी वियोगें बहाती । झालें मजप्रति तैसें आतां ॥१॥ चुकलीया माय बालकें रडती । झालें मजप्रति तैसें आतां ॥२॥ वत्स न देखतां गाई हंबरती । झालें मजप्रती तैसें आतां ॥३॥ जीवनावेगळे मत्स्य तळमळती । झालें मजप्रति तैसें आतां ॥४॥ नामा म्हणे मज ऐसें वाटे चित्तीं । करितसे खंती फार तूझी ॥५॥ डोलत डोलत टमकत चाले । गोजिरीं पाउलें टाकुनियां ॥१॥ पायीं रुणझुण वाजतात वाळे । गोपी पहातांत डोळे मन निवे ॥२॥ सांवळे सगुण मानस मोहन । गोपी रंजवण नामा म्हणे ॥३॥ तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ॥१॥ माता विठ्ठल पिता विठ्ठल । बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥२॥ गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल । निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल ॥३॥ नामा म्हणे मज विठ्ठल सांपडला । म्हणोनी कळिकाळां पाड नाही ॥४॥ देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥१॥ चरण न सोडी सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ॥२॥ वदनीं तुझे मंगलनाम । हृदयी अखंडित प्रेम ॥३॥ नामा म्हणे केशवराजा । केला पण हा चालवी माझा ॥४॥ देहुडा चरणीं वाजवितो वेणू । गोपिकारमणु स्वामी माझा ॥१...